फुलझाडांनी सजवा बाल्कनी

balcony garden-झाडे, रोपट्यांसाठी ऊन अत्यावश्यक असते. हे सगळ्यांनाच माहीत आहे; पण काही रोपटे अशीही असतात, जी कमी उन्हातही जोमाने वाढतात. घर सजावटीसाठी अशी रोपटी उत्तम ठरू शकतात. कमी ऊन मिळत असेल अशा ठिकाणी सुंदर पानाचे विविध प्रकारचे पाम, फायकस, फर्न, मनी प्लांट, क्रोटन, मोनस्टरा आदी झाडे लावली जाऊ शकतात.बाल्कनीच्या भिंती व खांबावर रोपट्याच्या कुंड्या टांगल्या जाऊ शकतात. आजकाल लोखंडी तारांनी बांधलेल्या प्लास्टिकच्या टोपल्या बाजारात मिळतात. त्यांच्यातही ही झाडे लावता येतात. बाल्कनीत रेलिंग असेल, तर त्यात कुंड्या ठेवल्या जाऊ शकतात. फक्त कुंड्यातून पाझरणारे पाणी खाली पडणार नाही, यासाठी त्याच्या खाली एक भांडे ठेवण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रेलिंगच्या आसपास द्राक्षाची वेल वा टिकोमा लटकवला जाऊ शकतो. त्यातून बाल्कनीचे सौंदर्य आणखी वाढेल. बाल्कनी छोटी असेल तर कुंड्याऐवजी तिथे फक्त लटकणारी रोपटी लावावीत. समजा बाल्कनीत पुरेशी जागा असेल तर कुंड्यांमध्ये पालक, भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, कारली आदी भाजीपाल्याचीही लागवड करता येऊ शकते. बाल्कनीमध्ये चिनी माती, लाकूड, प्लास्टिक वा बांबूपासून बनलेल्या वस्तूंचा वापर रोपटी लावण्यासाठी केला जाऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नवरंग, मुर्गकेश आदींसारखी रोपटी कुंड्यामध्ये लावली जाऊ शकतात, तर हिवाळ्यात झेंडूसारखी फुलझाडे लावता येतात. गुलाब, रातराणी, टिकोमा, बोगनवेलिया यासारखी बारमाही फुलांची रोपटीही बाल्कनीतील कुंड्यांमध्ये लावता येतात; मात्र बाल्कनीमध्ये जागेचा अंदाज न घेता झाडांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जेवढय़ा झाडांची काळजी घेणे सोयीचे जाईल, तेवढी लावणे आवश्यक आहे.