बलात्कार …बलात्कारी ……!!!!!

                    balatkari काहीही करून आज आपण हा सिनेमा पूर्ण  पाहायचाच  …! गेल्या पंधरा वर्षात आपण  हा सिनेमा पूर्ण पाहूच  शकत नाही  …. का …?  पण आज  पाहायचाच असा मनाचा निश्चय  करुनच टिव्ही समोर  बसले घरात अर्थात माझ्याशिवाय कुणी नव्हते …. ! सर्व दारं खिडक्या नीट बंद केल्या आणि मनाचा हिय्या करून मी टिव्ही समोर  सिनेमा पहायला लागले  …… !

     आणि  जस जसा सिनेमा पूढे सरकत होता, आणि तो विशिष्ट सीन येण्याची वेळ जवळ  येत होती तस तसा माझा माझ्या मनावरिल आतापर्यंतचाठेवलेला   ताबा सुटायला लागला  … माझ्या छातीत धडधड सुरु झाली  …कितीही कंट्रोल करीत असतांनाही डोक्याला झिनझिन्या येउ लागल्या होत्या  . आणि तो सीन सुरु झाल्या बरोबर आपोआपच माझे अवसान गळाले  …आणि मी रिमोट्चा ऑफ बटन दाबले  …. !!मी पुन्हा एकदा “तो” सिनेमा अर्धवट सोडला होता  …!!!

     “तो “ सिनेमा म्हणजे   “बैंडिट क्वीन ”  जो मी आजही पूर्ण पाहू शकत नाही  “फूलनदेवी ” या एक सर्वसामान्य मुलीचा  “बैंडिट क्वीन”दरोडेखोर होण्या पर्यन्तचा जीवन प्रवास हा या चित्रपटाचा विषय आहे .आजही  या चित्रपटातील  “तो ” बलात्काराचा सीन पहायची हिम्मत माझ्या जवळ नाही  …!  पण हल्ली तर रोज सकाळी उठल्या पासून एक नाही तर अनेक  “स्त्री” वरील लैंगीक अत्याचाराच्या बातम्या ऐकुन मनाच्या संवेदना भेदरून जात आहेत .आज एक स्त्री म्हणून विचार करताना स्त्रीच्या शरीराची चाललेली विटंबना   कशाचा परिपाक आहे ….?

     एका बाजुला एकविसाव्या शतकाच्याआग्मनाचे ढोल वाजवीत नव्या संगणक आणि युगाच्या पहाटेची वाट पहात आहोत ….!  विलक्षण प्रगत  अश्या तंत्रयुगाच्या आगमनाची वाट पहात आहोत  .   स्त्रीया  आज शिकत आहेत  …. शिकवित आहेत  …!भारता सारख्या अतिपारंपारिक देशात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन क्षेत्रं पादांक्रात  करीत आहेत,  पण तरीही …पण तरीही प्रश्न उरतोच  “आजची आधुनिक स्त्री खरंच “माणूस ” म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली आहे  …?

     अजुनही स्त्रीचे “वस्तुपण” संपलेले नाही  . तिच्यावरील अन्याय अत्याचाराचा तपशील बदललाय    !पण त्यामागचे पुरुषीमन तेच आहे .  कदाचित अधिक विकृत झालेलं  आहे …. !म्हणुनच  समाजातील पुरुषी विचारसरणी , मानसिकता महाभारत कालिनच आहे  . आजच्या दिल्ली , मुंबई मधील  बलात्काराच्या घटना कशाच्या द्योतक आहेत  … ! महाभारतात द्रौपदी , ययाति पुत्री माधवी यांच्यावरील पुरुषी वर्चस्वाच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत  ….! आणि आजही कितीतरी द्रौपदी, माधवी  यांचे शील हरण केले जात आहे . स्त्रीमानाचा आणि तिच्या भोवतीच्या वास्तवाचा कुणीतरी , कधीतरी वेध घेण्याचा प्रयत्न  आहे का  …. ….? जेंव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार करून तिच्या शिलाचा , तिच्या कौमार्याचा भंग केला जातो तिची ती पीडा कोण लक्षात घेते  ….? स्त्रीवर असा घृणास्पद अत्याचार करणा-या पुरुषाची मानसिकता ,  ह्या क्रौर्य मनाचा पोत पुरुष मनच ओळखू शकतात  …! कारण स्त्रीची शील हरणानंतरची नव्हे ती  शील हरणा पूर्वीची मानसिकता मी  तो “बैंडिट क्वीन ” सिनेमा पहात असताना अनुभवली आहे  …! तर प्रत्यक्ष असा घृणास्पद प्रसंग ज्या दुर्दैवी स्त्रीवर गुदरला  आहे  …. तिच्या मनाची पीड़ा कशी असेल  …???  स्त्रीच्या कौमर्याचे लचके तोड़नारे ही गिधाड़ेच आहेत ….!   स्त्रीच्या मनाची आणि देहाची विटंबना  करणारे हे नरभक्षक आहेत।

समाजात एकुणच समाजव्यवस्थेत स्त्रीचे चारित्र्यहनन करणे या इतकी सोपी गोष्ट नाही।       “स्त्री म्हणजे पैर की जुती ”  किंवा   स्त्रीचे शील म्हणजे काचेचे भांडे  …. एकदा तडकले की परत सांधता येत नाही …”  हे या समाज व्यवस्थेतील स्त्रीयांबाबतीतिल अलिखित नियम आहेत  ….!  याच पुरुषी मानसिकतेतुन स्त्रीला नेहमीच दुबळ समजुन दाबलं आहे  … !  “भोगाची वस्तु ” हेच तिचं मूल्य आणि समाजव्यवस्थेतील स्थान होउ पहात आहे  …!   आजकाल स्त्रीयांवरिल  अत्याचाराच्या घटनांमधे  ल क्ष णिय वाढ झाली आहे  .  परत एकदा स्त्री घराच्या उम्बरठयाआड़ लपून राहिली  तरच ती  ” सुरक्षित ” अशी स्थिति या विकृत समाजाने स्त्रीवर आणली आहे  … !

     ” स्त्री”आदिम काळा पासून स्वत:च्या केवळ “स्व” साठी  नाही तर स्वत:च्या मन्युष्यवत  अस्तित्वासाठी लढत  आहे।   तिने आजही हक्क ओरबाडून मिळवले नाहीत तर  स्त्रीत्वाच्या सर्व परिसीमा भेदुन पुरुषी समर्थ्याच्या सर्व शक्यता पर्यन्त स्वत:ला सिध्द करून  मिळवले आहेत. ….! मग “संभोग ” हाही तिचा स्वत:चा हक्क का असू नये…? तिथेच मात्र तिला घरी दारी हक्क नाकारला जातो . माणुसपणाच्या पुढाकारान  कधीच का घडू नये  संभोग … !  या विकृत समाजाकडून तोच तिचा हक्क ओरबाडून घेतला जात आहे ….!! तिचे लचके तोडले जात आहेत ….!

खरे तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्त्री-पुरुषांना ख-या अर्थाने समानतेच्या जगात आणण्यासाठी आवश्यक ती मानसीकता . शैक्षणिक    आणि आर्थिक पात्रता प्राप्तच होउ नये  अश्या  दिशेने सगळा प्रवास चाललेला दिसतो . त्यामुळे कायदे ,  आयोग असोत की प्राचीन काळापासून चालत आलेली स्त्री गौरवाची सुभाषिते असोत, यांचा कितीही वर्षाव झाला तरी स्त्रीची परिस्थिति प्रत्यक्षात किती बदलली  …?बदलते?

पण संघर्ष अटळ आहे.! आणि तरीही नदी,धरती ,आग, हवा ही सर्व स्त्री रूपं आहेत ,  शतकानुशतकांच मौन मोडून जेंव्हा ती  आक्रोश करतील तेंव्हा “भोगण” या शब्दाचा आविष्कार काय असतो त्याचा प्रत्यय सा-या जगाला येइल आणि त्याच दिवशी जगाला कळेल पुरुष प्रधान व्यवस्थेत काय अर्थ असतो “स्त्री” असण्याचा आणि का व्याकुळ होते  मन जेंव्हा तिचं माणूसपण  अमानुषपणे नाकारलं जातं आणि केवळ शरीर भोगलं  जातं  …! आणि त्याच दिवशी रुजतिल समाजात तिच्या विषयीच्या आस्था , दृढ़ता , प्रीती ,  आशा  , निष्ठा , प्रार्थना ,  वेदना  आणि  उदारता  …!!!! कारण …….

 

“स्त्रीच   आई  आहे ,

सावित्री  आहे ,

राधा आहे,

आणि दुर्गाही  आहे  ……!!!!!

 

 

” समिधा”