बळीराजा नावाची जात

balirajaमोत्यांनी चमकते हिरवेगार शिवार

कधी पाहायलाच मिळाले नाही

राखाडा मातींत पडलेली धस्कट

टोचत राहिली पायांना

विव्हळत राहिलो वेदनांनी तरीही

धरणाचा पाणी मिळाल नाही

 

ते आले अनुदानाची भिक मागून गेले

हातातोंडातला घासदेखील ओढून नेला

हावरटानी तालुक्याला

बायकोपोराना अंग झाकायला

पळसाची तीन पान आणि

लुगड्याला सतरा ठिगळ

 

खायला घालायला कुणब्याची गरज तरी

धनदांडग्याना सतेचा माज

उन्हातान्हांत बिनभाकारीच काम करून

रापलेले पाय धरायला

दर निवडणुकीला उभे आणि नंतर

त्यांनीच उडवलेली थुंकी

आमच्या पायावर घेऊन

मारल्या मंत्रालयात चकरा

भिक मागण्यासाठी

सावकाराच्या घरातून चोरलेल्या

मुठ भर बाजरीवर

जित राहण्याची परवानगी द्यावी लागते

 

डोळ्यातल पाणी सुद्धा

कडक उन्हात वाळले

फास लावायला

सुतळीच तोंडसुद्धा नाही

चार वित आकाराच्या

नापिक राखाडी तुकद्यावर

उभं राहूनक आताशा

पावसाचीपण भीक मागावी लागते.

 

म्हणे लोकांचं पोट भरणारा

‘ बळीराजा ’

त्याचा हाडांचे सापळे दिसायला लागले

तरी न केली कुणी कीव

अन दिली नाही चतकोर भाकरी

 

पुढ पुढ ‘बळीराजाची’ जात

दुनियेत दिसणार नाही आणि

सायबाची पोर बापाला

विचारतील,-

“ आपल्याला खायला कोण देत हो बाबा ..?”

 

 

– मेघागौरी घोडके