बसमधील राखीव जागेची कहाणी……

downloadएकदा बसने नाशिकला निघालो. सोमवार असल्याने सकाळच्या बसला बऱ्यापैकी गर्दी होती. बसायला जागा न मिळाल्याने उभे राहूनच प्रवास करावा लागला. मला तशी सवय असल्याने काही वाटले नाही, मात्र माझ्यासोबत प्रवास करणारा सहप्रवासी जो पायाने बराच अधू होता. तो बिचारा कसाबसा उभा राहिला. त्याची कुणाला कीव आली नाही. ते जावू द्या, अपंगांकरिता राखीव असणाऱ्या सीटवरील प्रवासी देखील जागा देण्याचे सौजन्य दाखविण्यास तयार नव्हता. अशातच तिकीट काढण्यासाठी कंडक्टर आला. अपंग सह्प्रवाशाकरिता भाड्यात सवलत असल्याने त्याने सवलतीचे तिकीट मागितले. मात्र, कंडक्टरने त्याच्याकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र मागितले. आधीच गर्दी, त्यात अवघडून कसे-बसे उभे असलेल्या ‘त्या’ने कशाबशी आपली कुबडी सांभाळत पिशवीतून प्रमाणपत्र काढून कंडक्टरला दाखविले आणि सवलतीच्या दरांत तिकीट घेतले. कंडक्टरने त्याचे ‘कर्तव्य’ चोख बजावले. मात्र मला न राहवून असे वाटले कि, त्या सह्प्रवाशाचे अपंगत्व लक्षात न येण्याजोगे नव्हते. गर्दी असल्याने त्याला अवघडायला नको म्हणून प्रमाणपत्र मागितले नसते तरी चालले असते. मनातील चलबिचल न दाखविता मी कंडक्टरकडे ‘त्या’ सह्प्रवाशाकरिता अपंगांसाठी राखीव असलेल्या जागेची मागणी केली. कंडक्टरने मग राखीव जागेवर बसलेल्या प्रवाशाला उठून अपंग सहप्रवाशाला बसू देण्याची विनंती केली. मात्र तो उठण्यास तयार झाला नाही. बरीच बाचाबाची झाली, माझी त्या कंडक्टरशी आणि कंडक्टरची राखीव जागेवर बसलेल्या धडधाकट प्रवाशाशी. तितक्यात चांदवड आले आणि एक जागा रिकामी झाली. मी त्या जागेवर त्या अपंग सहप्रवाशाला बसवून वाद मिटविला.

     मात्र हा वाद इथेच मिटला असे नाही. कित्येकदा बसने प्रवास करतांना असेच होते. अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक इ. करीता राखीव जागेवर इतर लोकच अधिक प्रवास करतांना आढळतात. ज्याचे-त्याचे दुखणे ज्याला-त्यालाच कळते, मात्र आपण थोडेफार सौजन्य दाखवून ते कमी तर करू शकतो ना? महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर एखादा कॉलेजकुमार आणि जागा नसल्याने अवघडून उभी असलेली गरोदर महिला असेहि प्रसंग पाहायला मिळतात. आपण आपली संवेदनशिलता हरवून बसलो आहोत का? असाच प्रश्न अशावेळी पडतो. जसे आपल्या घरातील लोक हे आपले कुटुंबीय असतात, तसे बसने प्रवास करीत असताना आपले सहप्रवाशी हे आपले कुटुंबियाच का वाटू नयेत? गरजू प्रवाशांकरिता जागा सोडली अथवा वाटून घेतली तर बिघडते कुठे? त्याउलट आपल्याला त्यांच्या शुभेछाच प्राप्त होतात आणि आपल्यालाही आपण एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पडल्याचे समाधान मिळते! बघा असे समाधान मिळवून, खूप छान वाटते!

One Comment