बालहट्ट

‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्‍यांना योग्य ते वळण देण्याचे महत्त्वाचे काम पालकांना करावे लागते.

एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी मुलांनी हट्ट करावा अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ, मी उत्तम चित्रे काढू शकेन, मी शर्यतीत पहिला येऊ शकेन, अशी स्वप्ने दाखवल्यास ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुले जीवाचे रान करतात आणि हट्टाला विधायक मार्ग मिळून ते यशस्वी होतात.

मुलांचा हट्ट थांबवता येत नाही पण त्याचे स्वरूप मात्र आटोक्यात ठेवता येते. मुलांनी असे करणे अपेक्षित नाही त्याची स्पष्ट शब्दांत कल्पना द्यायला हवी. त्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी बदल करू नये. मात्र लहान मूल हीसुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचे भान ठेवायलाच लागते. त्यांच्या छोट्या छोट्या संयुक्तिक मतांचा आदर केल्यास तेदेखील आपल्या मताचा आदर करायला शिकतात. उगाचच नकार देण्यापेक्षा त्यामागची कारणे समजावून सांगावीत. म्हणजे आपण म्हणतो त्या प्रत्येकच गोष्टीला आई-बाबा नाही म्हणत नाहीत याची जाणीव होते.