बीट खा, तंदुरुस्त राहा

Beetrootआपल्या आहारात सर्व भाज्यांचा समावेश असायला हवा. बरेचदा मुलांना आवडणार्‍या भाज्याच बनविल्या जातात. काही भाज्या मुद्दाम टाळल्या जातात. त्यांचा वापर होत असला तरी र्मयादित असतो. बीटचाही याच गटात समावेश होतो. बीटचा अधिक वापर होत नाही, पण हे कंदमूळ पोषणमूल्यानं युक्त आहे. बीट लालभडक रंगामुळे आकर्षित करून घेते. बीटमध्ये फॅट्स अजिबात नसतात, कॅलरीजही कमी असतात. यात मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. कर्करोगाशी लढण्यात बीटचे सेवन उपयुक्त ठरते. वय वाढण्याबरोबर माणसाची कार्यशीलता, चपळता कमी होते. अशा वेळी बीट ज्यूसच्या सेवनाने ऊर्जा मिळते. रक्तवाहिन्या सक्रिय होतात. बीट ज्यूसमध्ये धमन्यांचे आकुंचन थांबविण्याची शक्ती असते. हाय ब्लडप्रेशर असणार्‍यांसाठी बीट ज्यूस वरदान आहे. बीटमधील उच्च दर्जाच्या अँण्टी ऑक्सिडंटमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे दैनंदिन सेवनाने किडनी आणि पित्ताशय स्वच्छ राहते. बीटची पानेही पौष्टिक असतात. त्यामध्ये बिटा कॅरोटिन, अँण्टी ऑक्सिडंट, फॉलेट, लोह, पोटॅशियम आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे स्त्रियांसाठी, विशेषत: गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत उपयोगी ठरते.