भरवशाचा ‘विराट’

indexविराट कोहलीने परवा केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे अक्षरशः डोळ्यांची पारणे फिटली! त्याने अगदी नावाला साजेशीच ‘विराट’ खेळी केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! फक्त ५२ चेंडू १०० धावा म्हणजे अफलातूनच! त्याने फटकावलेले ८ चौकार आणि सहा उत्तुंग सत्कार म्हणजे ‘दिवाळी आधीची मेजवानी’ असा काहीसा प्रकार होता!

ह्या खेळीमुळे भारतातर्फे सर्वात वेगवान शतक नोंदवणारा खेळाडू अशी ओळख जरी त्याने मिळविली असली तरीही ह्या शतकाचे मोल याहूनही जास्त आहे! कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून महान खेळाडू सचिन तेंडूलकरने नुकतेच क्रिकेटला अलविदा केले. ‘सचिनची जागा भरून कशी निघणार?’ असा प्रश्न पडला असतांना विराटच्या खेळीने याचे उत्तर सापडले असेच म्हणावे लागेल! मधल्या फळीत विराट एक भरवशाचा फलंदाज ठरतो आहे. ११५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६ शतके आणि पंचवीस अर्धशतके नोंदवून विराटने आपली योग्यता सिद्ध केलेली आहे. मुख्य म्हणजे सचिनप्रमाणे विराटही एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही प्रकारात सरस खेळाडू आहे. अवघ्या २४ वर्षांचा विराट भविष्यात सचिनचा विक्रम मोडतांना दिसला तर आश्चर्य वाटायला नको!

2 Comments