भारताची मंगळमोहीम….

index इस्त्रोने आपल्या मंगळमोहिमेस प्रारंभ करून देशवासियांना दिवाळीची अनोखी भेट दिली. काल भाऊबीजेच्या मुहूर्तावर दुपारी ठीक २ वाजून ३८ मिनिटांनी ‘पीएसएसव्ही सी-२५’ अग्निबाणाच्या सहाय्याने भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले आणि भारताच्या पहिल्या-वहिल्या मंगळमोहिमेचा श्रीगणेशा झाला. भारताने आपल्या आजवरच्या अवकाश कार्गीर्दीत केलेल्या प्रगतीतील हा आजवरचा सगळ्यात मोठा टप्पा मानण्यात येतो. इस्त्रोच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण स्थळावरून हे यान अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले.  हे यान सुमारे १३५० कि. ग्राम. वजनाचे असून ३०० दिवसांच्या प्रवासानंतर ते मंगळावर पोहोचेल. ४६० कोटी रुपये खर्चाच्या ह्या महत्वाकांक्षी मोहिमेवर प्रशांत महासागरातून नजर ठेवली जाणार आहे. १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रस्थान करून २४ सप्टेंबर २०१४ रोजी उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थिरावणे अपेक्षित आहे. हे यान मंगळाभोवती फिरून तेथील वातावरण आणि मिथेनच्या साठ्याबाबत माहिती घेणार आहे. यापूर्वी चीन आणि रशियाने आखलेल्या मंगळमोहिमा अयशस्वी झाल्यानंतर इस्त्रोच्या मंगळमोहिमेचे महत्व अधिकच वाढले आहे.

वाढती महागाई, रुपयाचा घसरलेला दर अशा काहीशा नकारात्मक गोष्टींनी त्रस्त झालेल्या देशवासियांमध्ये चैतन्य निर्माण करणारी हि एक घटना आहे. ‘इस्त्रो’ ने आखलेल्या मोहिमा आणि प्रगती सुखावह असून देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्याच ठरल्या आहेत