भाषावाद

bhashaभाषावाद,प्रांतवाद,जातीयवाद, धर्मवाद,राष्ट्रवाद या सगळ्यांपलिकडे जाऊन, एक मानव म्हणून पृथ्वीवासीयांनी विचार करावयास हवा. भाषेविषयी म्हणाल,तर जगातील सोडूनच द्या,आपल्या भारतातच इतक्या भाषा व बोलीभाषा आहेत,की भल्या भल्या भाषापंडीताचीच बोलती बंद व्हावी ! भाषा,रुढी-परंपरा,चालीरिती याबाबतीत आपल्याकडे इतकी विविधता आहे,की तशी पृथ्वीतलावर इतरत्र क्वचितच आढळेल ! त्यामुळेच स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या भारतवर्षातील गणराज्यात एकमेकांविषयी आस्था नव्हती. याच फुटीचा फायदा उचलीत तर इंग्रजानी एकेक गणराज्य गिळंकृत केले.

ब्रिटीश साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता,असे म्हणतात अन् ते खरेच होते. पृथ्वीवरील एकही भूभाग असा नव्हता,जिथे इंग्रजांची सत्ता नव्हती. त्यामुळे इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या देशातील लोकांना इंग्रज म्हणजे साक्षात देवाचा अवतार न वाटता,तरच नवल ! तसेच इंग्रजी भाषा ही देवभाषा समजली जाऊन,तिच्याप्रति कमाल आसक्ती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको !

आपल्या अखत्यारीतील एकेका देशाला स्वातंत्र्य बहाल करीत असतानाच,इंग्रजांनी कळत नकळत तेथील मातृभाषांचा जवळजवळ गळाच घोटला होता नि सरतेशेवटी जे होऊ नये ते झालेच ! काही सन्माननीय अपवाद वगळता (चीन,जपान इ.देश) अवघ्या जगातील भाषापंडीतांनी इंग्रजी या भाषेला ” विश्वभाषा “, ” ज्ञानभाषा ” म्हणून मान्यता दिली. आपल्याकडील संस्कृत व पाली भाषेत उपलब्ध असलेले प्रगाढ ज्ञान तसेच कुजत पडले. आता ते ग्रंथही उपलब्ध नाहीत नि ते वाचून त्यांचा खरा अर्थ सांगणारेही हयात नाहीत. बौध्द विहारात व नालंदा-तक्षशिलासारख्या विद्यापीठातील अमाप ग्रंथसंपदा,एकतर यवनी आक्रमणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली वा जीव वाचवताना काही बौध्द भिक्षूंनी ती चीन व तिब्बत येथे नेली.

भाषासौंदर्याबरोबरच अमूल्य असा वैचारिक ठेवा गमावल्याचे शल्य,प्रत्येक भारतीयाचे काळीज पोखरुन टाकते …..!

One Comment