“भेटी लागी जीवा”

VITTHAL

“”जाता पंढरीसी भेटी लागी जीवा”वारकरी साम्प्रदायचा आनंदोत्सव असलेली आषाढ एकादशी.लाडक्या विठूरायाला साकड घलान्याचा सण.पंढरीची वारी‘ म्हणजे महाराष्ट्रसंस्कृतीची सौभाग्यचंद्रिका आहे. भाग्यरेखा आहे. पुण्यरेखा आहे. वारीच्या विराट, विशाल महासागरात प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाचं दर्शन घडतं. श्रीविठ्ठल उपास्य दैवत असलेला आणि महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांमध्ये संख्येनं निःसंशय मोठा, प्रधान, अत्यंत लोकप्रिय आणि कार्नाटकातही प्रचलित असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. 

“वारकरी संप्रदाय‘ असं नाव धारण केलेल्या या भक्तिपंथाचं मूळ स्वरूप वैदिक धर्माचंच तत्त्वज्ञान प्रतिपादन करणारं आहे. वारकरी संप्रदायाचं भाग्य असं, की ज्ञानदेवांसारख्या विभूतिमत्वानं याच भागवत धर्माला शिरोधार्य केलं. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा गंगा-सिंधूच्या खोऱ्यातही नाचविली. “शब्दाहून आचार मोठा असलेला‘ एकनाथांसारखा क्रांतदर्शन महात्मा या संप्रदायाला लाभला. समाजातील जातिभेद नाहीसे व्हावेत म्हणून नाथांनी जी क्रांती केली, त्याला तोड नाही. आपल्या अभ्यासानं, वैराग्यानं आणि श्रद्धेनं नराचा नारायण होता येतं, हे तुकारामांनी देहूसारख्या लहान गावात राहूनही सिद्ध केलं.  संप्रदायाला फार फार उत्तुंग कर्तृत्वाचे संत परंपरेनं लाभले. वारकरी संप्रदायाची प्रकृती समन्वयात्मक असल्यामुळेच वारकरी संप्रदाय रुजला, वाढला आणि परिणामी लोकप्रियतेच्या कळसाला जाऊन पोचला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील असला तरी त्याचं स्वरूप विश्‍वात्मक भावाचं आहे. कारण वारकरी संप्रदायाची बैठक अद्वैत तत्त्वज्ञानाची आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्माचंच विकसित रूप होय. त्यामुळे या संप्रदायाला भागवत धर्म असंही म्हणतात. 

पंढरपुरी आषाढी-कार्तिकी या मोठ्या यात्रा भरतात. चैत्र व माघ या मासातही यात्रा भरतात; पण त्या आषाढी-कार्तिकीच्या तुलनेनं लहान असतात. या यात्रांच्या वेळी देवाचं वा देवीचं स्नान व पूजा सोडून इतर सर्व उपचार बंद असतात. आणि देव भक्तासाठी सर्वकाळ मोकळा असतो. यात्रेनंतर देवाची प्रक्षालनपूजा होते आणि मग देवाचे नित्योपचार पुनश्‍च सुरू होतात.