महायुतीचा “नमो”नारा

modi
आघाडी सरकारचा बालेकिल्ला समजल्या  जाणाऱ्या महाराष्ट्रात आता मोदी नावाच्या ब्रम्हस्त्राने आघाडी सरकारला महाराष्ट्रात देखील चीतपट केलं आहे. 

मोदींचे नाणे महाराष्ट्रातही खणखणीत चालले. राज्यात शिवसेना-भाजपसह महायुतीने मिळवलेले यश अभूतपूर्व आहेच; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या कारभाराला लोक किती वैतागले आहेत, याची जाणीव करून देणारेही आहे. प्रत्येक निवडणुकीत दोनचार जागा मागेपुढे झाल्याने नंबर वन कोण, यावर वाद घालत बसणाऱ्या आघाडीला लोकांनी अक्षरशः कोपऱ्यात ढकलले. राज्यात काही नाही तरी मुख्यमंत्र्याची प्रतिमा तारेल असे सांगितले जात होते, या गृहीतकाचेही तीनतेरा वाजले. राज्यात कॉंग्रेसचे खाते उघडले ते अशोक चव्हाणांनी; ज्यांच्या प्रतिमेचा त्रास होईल असे सांगितले गेले त्यांनी. कॉंग्रेसला अवघ्या दोन जागा मिळणे ही मुख्यमंत्र्यांसह सगळ्या पक्षाचीच नामुष्की आहे. मोदींच्या लाटेत छगन भुजबळ, नीलेश राणे, प्रफुल्ल पटेल, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे, पद्मसिंह पाटील असे भलेभले वाहून गेले. नाही म्हणायला कोल्हापुरात सदाशिवराव मंडलिकांच्या मुलाचा पराभव करून राष्ट्रवादीने मागच्या अपमानास्पद पराभवाची परतफेड केली. आघाडीत शेखी मिरवायचीच असेल तर कॉंग्रेसपेक्षा जागाही जादा मिळवल्या. सहाच महिन्यांत राज्यात निवडणुकीची परीक्षा देताना दोन्ही सत्ताधारी पक्षांपुढे काय वाढून ठेवले आहे, याचे दर्शन निकालाने घडवले आहे. दुसऱ्याच्या करिष्म्यावर आपला पक्ष उभा करता येत नाही, हा धडा मनसेला लोकांनी दिला. 

2 Comments