माय माझी
|कळतच नव्हत मला,
माय माझी एकटीच का रडायची..
तिच्या ताटातली अर्धी भाकर,
रोजच मला का वाढायची…
माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची..
काय पहात होती कुणास ठाऊक पण,
पदराखाली मला घट्ट धरून बसायची…
पाऊस नव्हता तरी सुद्धा,
माझ्या अंगावर थेंब पडायची..
मांडीवर मला थोपटतांना,
तिची का झोप उडायची…
काहीच नव्हते घरात तरी,
ती घराला फार जपायची..
एकच होत लुगड तिला,
तेच ती धुवून रोज नेसायची…
सणावाराच्या दिवशी मात्र,
माझ्यावर करडी नजर ठेवायची..
जावू नये कुणाच्या घरी म्हणून,
मला घरातच लाडीगोडी लावायची…
रोजच सकाळी हात जोडून,
देवाला काहीतरी मागायची…
गालावर हात फिरवून माझ्या,
बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची..
मातीच्याच होत्या भिंती,
पांढर्या मातीनेच लिंपायाची..
अंगणात टाकायची सडा नि,
घर शेणाने सुंदर सारवायाची..
सकाळीही रोजच मला,
घासून अंघोळ घालायची..
चुलीवरल्या भाकरीचा घास,
तिच्या हातानेच भरवायची…
शाळेत मला धाडतांना,
स्वप्ने मोठमोठी बघायची..
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा,
तरी माझ्याकडे पाहून हसायची…
कळतच नव्हत मला,
आई एकटीच का रडायची..
तिच्या ताटातली अर्धी भाकर,
रोजच मला का वाढायची.
