मार्कंडा मंदिर

markandaमार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

markanda templeअत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. ‘मैथुन शिल्पे’ हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना ‘विदर्भाची काशी’ म्हणतात ते उगाच नाही.

या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’ चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.

Markanda artमार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *