मुंबई मेट्रोला सुरुवात

metro

मुंबापुरीला गेली किमान तीन दशके राज्यकर्ते “मेट्रो रेल्वे‘चे स्वप्न दाखवत होते. अखेरीस मुंबईतील सव्वा कोटी जनतेच्या स्वप्नाची पूर्ती रविवारी झाली आणि या महानगराची पूर्व आणि पश्‍चिम टोके जोडली गेली. टोपीकर इंग्रजांच्या आमदानीत मुंबईतून दक्षिणोत्तर आगीनगाडी धावू लागल्यानंतर तब्बल 160 वर्षांनी एतद्देशीय सरकारने ही रेल्वे लाइन टाकली, एवढी एकच बाब आपल्या “कर्तबगारी‘ची साक्ष देण्यास पुरेशी आहे! याच 16 दशकांत “ईस्ट इंडिया कंपनी‘च्या कोटातल्या मुंबईचे एका अक्राळविक्राळ महानगरात रूपांतर झाले होते आणि नव्या वाहतूक सुविधांची गरज प्रकर्षाने निर्माण झाली होती. पण सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत राजवटीत आठ वर्षांपूर्वी घाटकोपर ते वर्सोवा-अंधेरी अशा “मेट्रो‘ची कोनशिला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आली आणि अखेरीस ती रेल्वे आता धावू लागली आहे. पण पूर्वेकडील कमालीचे गजबजलेले घाटकोपर आणि पश्‍चिमेकडील सर्वाधिक गर्दीची अंधेरी अशी दोन टोके या प्रकल्पामुळे जोडली गेली असली, तरी त्यामुळे उपनगरी रेल्वे आणि महापालिकेची “बेस्ट बस सेवा‘ अशा सार्वजनिक वाहतूक यंत्रणांवरील ताण कितपत कमी होईल, याबाबत तज्ज्ञांच्या मनात तरी शंकाच आहे. आता मुंबईकरांपाठोपाठ पुणेकरही मेट्रो रेल्वेकडे डोळे लावून बसले आहेत; पण असे नवे प्रकल्प हाती घेताना सध्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी त्यांचा योग्य ताळमेळ घातला, तरच त्याचा खऱ्या अर्थाने फायदा “आम आदमी‘ला होऊ शकेल, एवढा धडा मुंबई मेट्रोकडून घ्यायला हरकत नसावी.