मॉल संस्कृती

mallsसध्या सुपर मार्केट आणि मॉल्स यांची संख्या वाढत आहे. इथे जाऊन खरेदीचा आनंद लुटण्याबरोबरच मॉल संस्कृतीमध्ये काम करण्याच्या काही संधीही हेरायला हव्यात. मॉल संस्कृती बहरते आहे. त्यातील सर्व विभागांच्या कामांसाठी त्या त्या कामाचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचार्‍यांची गरज वाढते आहे. मॉलमध्ये ग्राहकांच्या मानसशास्त्राचा बारकाईने विचार केलेला असतो. मॉलमधला माल कसा मांडला आहे यावर त्या मालाची विक्री अवलंबून असते. म्हणून या मांडणीचा विचार करणार्‍या व्हिज्युअल र्मचंटायझिंग या शास्त्राचा उदय झाला आहे. या मांडणीवर वस्तूंची विक्री अवलंबून असतेच पण दुकानाविषयीचे ग्राहकाचे मत किंवा दुकानाचा ग्राहकावर पडणारा प्रभावही ठरत असतो. म्हणूनच कोणत्या प्रकारच्या दुकानात किंवा मॉलमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू समोर ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू मागे ठेवाव्यात, याचा विचार बारकाईने केलेला असतो. एवढेच नव्हे तर, तो माल कसा ठेवावा, याचाही सूक्ष्म विचार केलेला असतो. कोणत्या वस्तू किती उंचीवर ठेवाव्यात, याचाही विचार करावा लागतो. अधिक खपणार्‍या आणि अधिक प्रमाणात खरेदी केल्या जाणार्‍या वस्तू आधी ठेवलेल्या असतात आणि कमी विकल्या जाणार्‍या वस्तू मागे ठेवल्या जातात. काही वेळा मॉलच्या दर्शनी भागातील वस्तूंच्या मांडण्यातून होणारी सजावट आकर्षक नसेल तर त्या मॉलमध्ये लोक येतसुद्धा नाहीत. मॉल कोणत्या प्रकारचा आहे, प्रमुख ग्राहक कोणत्या वर्गातला आहे याचा विचार करून वस्तू मांडाव्या लागतात. ग्राहक मध्यमवर्गीय असेल तर उच्चवर्गीयांनाच परवडतील अशा वस्तू समोर ठेवून चालत नाही. आधी या गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार केला गेला नव्हता; पण आता ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा होऊन बसली आहे आणि काही ठिकाणी यासंबंधीचे समग्र ज्ञान देणारे अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत.