यश आणि अपयश

imagesअपयश ही यशाची पहिली पायरी असते असे नेहमीच म्हटले जाते. मात्र केव्हा? जेव्हा पहिल्यांदा आपल्या पदरी आलेल्या अपयशातून काही बोध घेऊन आपण त्यातील चुका शोधून त्या दुरुस्त करीत पुन्हा प्रयत्न केला तर! त्यासाठी गरज असते ती कठोर मेहनत, प्रयत्न आणि आणि प्रतिक्षेची!  

     प्रयत्नांती परमेश्वर’ अर्थात प्रयत्न करत राहिले तर परमेश्वराचीही प्राप्ती होते या अर्थाचे हे बोधवाक्य . मात्र, आजच्या संगणक युगात प्रत्येकाला झटपट यश हवे असते. संगणकासारख्या सर्वच गोष्टी झटपट व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. झटपट यश मिळेलही, मात्र ते कायम राहील याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही! झटपट यश मिळवितांना आपण आपली सहनशीलता गमावत असतो, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. यश मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर आपल्यातील उद्विग्नता वाढत जाते. आपला स्वभाव चिडखोर बनतो. आपले शारीरिक स्वास्थाकडे दुर्लक्ष होते, तसेच मानसिक तक्रारीही संभवतात.

     याउलट एखाद्या अपयशाने खचून न जाता नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक अडचणींवर शांतपणे विचार करून तोडगा काढला तर यश निश्चित मिळतेच आणि पुन्हा यशाची खात्रीही असते. मात्र त्यासाठी प्रतिक्षा करणे फार महत्वाचे आहे. प्रतिक्षा करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींमध्ये ‘सहनशीलता’ हा सद्गुण आढळतो. आणि हा गुण त्यांना नुसता व्यावहारिक जीवनात नाही तर कौटुंबिक, सामाजिक अशा सर्वच ठिकाणी उपयोगी पडतो. यशाला सहनशीलतेची जोड असली कि यश अधिकच खुलून दिसते!