रंगकाम करण्याआधी..

h Paintingलवकरच उत्सवपर्व सुरू होत आहे. बरेच जण गौरी-गणपतीच्या आधी घराची रंगरंगोटी करून घेण्यास प्राधान्य देतात. रंगकाम, किरकोळ डागडुजी, फर्निचर खरेदी आदी कामं उरकली जातात. पावसाळामुळे भिंतींचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि पुढच्या उत्सवासाठी घर सिद्ध करण्यासाठी रंगकाम काढलं जातं. या वेळी नक्कीच काही मुद्दे घ्यायला हवेत. सर्वप्रथम क्षतिग्रस्त भिंतींची दुरुस्ती करण्याकडे लक्ष द्यावे. भिंतींना ओल येऊन पोपडे धरले असल्यास त्याचप्रमाणे भेगा पडल्या असल्यास मोडिफाइड वॉटरप्रूफ मोर्टारने या भेगा भरून घ्याव्यात. या पॉलीमरनेच गळके पाइपही दुरुस्त करता येतील. पावसामुळे टाईल्स उखडल्या असल्यास त्वरित बसवून घ्याव्यात, अन्यथा भिंतीमध्ये ओल पसरू शकते. रंग देण्याआधी भेगा बुजवून पृष्ठभाग समतल करण्यासाठी गिलावा करा. वॉटरप्रूफ पुट्टीने हे काम साधलं जातं. बरेचदा पावसामुळे प्लास्टर फुगतं, भिंतीचा काही भाग उखडतो ही सर्व दुरुस्ती करूनच रंगाकडे वळायला हवं. भिंतींवरची बुरशी काढण्यासाठी ब्लिचपावडरयुक्त पाण्यानं स्वच्छता करून काही काळ सुकण्यासाठी जाऊ द्यावा. त्यामुळे रंगकामाचा दर्जा सुधारतो.