राज्यातील ४४ टोलनाके रद्द

tollराज्यातील तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्याचा मोठा निर्णय  सरकारने आज घेतला आहे.

राज्यातील ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत लहान रक्कम आणि कमी अंतरावर असणारे तब्बल ४४ टोलनाके रद्द करण्यात आले आहेत. तसेच ‘एमएसआरडी’च्या टोलनाक्यांवर एसटी बसेसलाही टोलमुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळात सरकारने ही घोषणा केली. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. 
विधानसभा निवडणुकांची चाहुल लागली असल्याने राज्यातील जनतेला दिलासा देणाऱया निर्णयांचा सपाटा सुरू होण्याची ही सुरूवात असल्याची चिन्हे आहेत. मात्र, निवडणूका लक्ष्य ठेवून निर्णयाचा ‘टायमिंग’ साधल्याच्या वृत्ताला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भूजबळ स्पष्ट नकार दिला आणि हे टोल रद्द करण्यासंबंधीची फाईल सहा महिन्यांपूर्वीच अर्थखात्याकडे पाठविण्यात आली होती.

परंतु, अर्थखात्याने निर्णय घेण्यास विलंब केला असल्याचे म्हणत टोलनाके बंद करण्याच्या निर्णयाला लागलेल्या विलंबाचे खापर भूजबळ यांनी अर्थखात्यावर फोडले आहे.