राष्ट्रकुल खेळाडूंची चांदी.

oly
खेळ कुठलाही असो त्या मध्ये विश्व पटलावर देशाचं आणि राज्यच नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी प्रशासनातर्फे बक्षिसाची मोठी रक्कम दिली जाते.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राची सुवर्णपदक विजेती राही सरनोबत हिचा पन्नास लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
राहीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले; तर मुंबईच्या आयोनिका पॉलने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्यपदकाचा वेध घेतला. आयोनिकास वीस लाखांचे बक्षीस देण्यात येईल. गणेश माळी (56 किलो), ओंकार ओतारी (69 किलो), चंद्रकांत माळी (94 किलो) यांनी वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉंझ जिंकले. त्यांना वीस लाख देण्यात येतील.

राज्य सरकार यापूर्वी सुवर्णपदकास दहा लाख, रौप्यपदकास साडेसात लाख; तर ब्रॉंझपदकास पाच लाख देत असे. या पदक विजेत्यांनी केवळ राज्याचीच नव्हे; तर देशाचीही शान उंचावली आहे. त्यामुळे त्यांचे बक्षीस वाढविण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर या क्रीडापटूंना घडविणाऱ्या प्रशिक्षकांनाही बक्षीस मिळणार आहे. त्यानुसार राहीच्या प्रशिक्षकांना 12 लाख 50 हजार, आयोनिकाच्या प्रशिक्षकांना साडेसात लाख; तर वेटलिफ्टर्सच्या प्रशिक्षकांना पाच लाख मिळतील.

राज्य सरकारने यापूर्वीच पदक विजेत्यांना सरकारच्या सेवेत थेट सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. राहीची यापूर्वीच उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य पदक विजेत्यांनाही सरकारच्या सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.