राष्ट्रध्वजाचा मान राखू या…….

प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्यदिन, अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत तो दिवस साजरा करण्याचा उत्साह ठासून भरलेला असतो! सकाळी करकरीत पांढरे कपडे परिधान करून सर्वजण ध्वजवंदनासाठी घराबाहेर पडतात. जातांना आपल्या वाहनावर लावण्यासाठी, लहान मुलांच्या हातात फडकविण्यासाठी  अथवा खिशाला लावायचे लहान तिरंगी झेंडे विकत घेतो. तिरंगी झेंडे अशाप्रकारे लावल्याने राष्ट्रीय सणाची शोभा तर वाढतेच सोबत आपल्या देशप्रेमालाही उभारी येते!

        मात्र, ह्याच तिरंगी झेंड्यांची दयनीय अवस्था दुसऱ्या दिवशी पाहायला मिळते!  हे झेंडेDSC_0198 अगदी कुठेही, नको त्या ठिकाणी इस्ततः पडलेले आढळतात. झेंडे फडकवून आदल्या दिवशी उफाळून आलेले राष्ट्रप्रेम दुसऱ्या दिवशी ‘उतू’ गेलेले पहायला मिळते!  उणे-पुरे पाउणे दोनशे वर्षांच्या संघर्षानंतर, असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती देत, घरदार-संसाराची पर्वा न करता नेटाने लढत अभिमानाने तिरंगा फडकविण्याचा बहुमान आपल्याला मिळवून दिला, त्याची हीच किंमत करणार आपण? आपल्या अनमोल राष्ट्रीय प्रतीकाचा असाच अवमान करायचा असेल तर मग राष्ट्रध्वज विकतच का घ्यावा?

        चला, हा स्वातंत्र्यदिन अशा अनुचित गोष्टीला अपवाद ठरणारा साजरा करू या! स्वतःजवळील झेंडा स्वातंत्र्य दिनानंतर जबाबदारीने सांभाळून ठेऊ. त्याचा यथोचित सन्मान राखला जाईल याची काळजी घेऊ. झेंडा पायंदळी येणार नाही याची दक्षता घेऊ. प्लास्टिकचा झेंडा न वापरता कागदी झेंड्यांचा वापर करू.

चला, भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक असलेल्या तिरंगी ध्वजाला सन्मानाने नमन करू या!

तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जय हिंद! वंदे मातरम!

One Comment