लालूंना पाच वर्ष शिक्षा, राजकीय करगिर्द संपुष्टात….

imagesरांची इथल्या विशेष सी.बी.आय. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि अठरा वर्षांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या एका बहुचर्चित खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा संपली. बिहारचे मुख्यमंत्री असतांना कुणीही कल्पना करू शकणार नाही अशा जनावरांच्या चाऱ्याच्या पैशांमध्ये लालूप्रसाद यादव यांनी तब्बल ९५० कोटींचा घोटाळा केला. मात्र, निकाल लागेपर्यंत न्यायालयात हि रक्कम ३८ कोटींवर येऊन थांबली. पाच वर्षांच्या शिक्षेसोबत लालूंना २५ लाख रुपये दंडहि ठोठावण्यात आला. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र आणि संयुक्त जनता दलाचे विद्यमान खासदार जगदीश शर्मा यांच्यासह ४५ आरोपी या गैरव्यवहारात दोषी ठरले आहेत.

ह्या निकालामुळे लालूंची राजकीय कारगिर्द इतिहासजमा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘राजकारणाचे शुद्धीकरण’ करतांना एखाद्या गुन्ह्यात दोषी सिद्ध होऊन दोन वर्ष वा त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविता येणार नाही आणि जर अशी व्यक्ती आमदार किंवा खासदार असली तर त्याचे सभासदत्व तत्काळ रद्द होईल, असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. त्याची अंमलबजावणी होऊन लालूंना खासदारकीला तर मुकावेच लागेल त्याचबरोबर भविष्यातही निवडणूक लढविता येणार नाही. एखाद्या घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्याने राजकीय कारगीर्दीच संपुष्टात आलेले लालू हे देशातील पहिलेच नेते ठरले. ह्या खटल्यामुळे एका नौटंकीबाज नेत्याची राजकीय कारगिर्द संपली.