लाल बहादूर शास्त्री

Shastri_in_office     थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची आज जयंती! लाल बहाद्दूर यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ राजी झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.१९६५ च्या भारत-पाक युद्धात भारतीय जवानांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहत, त्यांनी राबविलेल्या मुत्सद्दी धोरणाच्या जोरावर पाकला चारी मुंड्या चित् करून भारतीय सैन्याने विजय मिळविला.

त्या आधी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही समर्थपणे पेलली होती. त्यांच्या कर्तबगारीवर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळविले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले. एका दुर्दैवी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. अशा प्रकारे राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.

उंचीने कमी मात्र कर्तुत्वाने श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या शास्त्रीजींच्या बाबतीत ‘मूर्ती छोटी, कीर्ती महान’ असेही कौतुकाने म्हटले जाई. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झालेल्या शास्त्रीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. राष्ट्राच्या दृष्टीकोनातून सैनिक आणि शेतकरी यांचे महत्व लक्षात घेता, दोघांच्याही सन्मानार्थ त्यांनी जारी केलेली ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा आजही लोकप्रिय ठरते.

१९६५ च्या युद्धातील विजयानंतर सोविएत रशियाने मध्यस्ती केली आणि तत्कालीन सोविएत संघातील ताश्कंद येथे युद्धबंदी करण्यासाठी भारत-पाक शांतीचर्चा घडवून आणली. ह्याच दरम्यान ताश्कंद येथे हृदयविकाराचे एकामागोमाग दोन तीव्र झटके आल्याने ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्राप्रती त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतमातेच्या ह्या थोर सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम!