वक्तशीरपणा
|हा गुण प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात आढळत नसला तरीही प्रत्येकाने आत्मसात करावा इतका महत्वपूर्ण गुण आहे! वेळेचे पालन न केल्यामुळे आपलेच नुकसान होते. जग जिंकावयास निघालेल्या नेपोलियन सारख्या वीर योद्ध्यानेहि युद्धाच्या ठिकाणी पोहोचण्यास पाच मिनिटे उशिर केल्याने त्याच्यावर पराभवाची नामुष्की ओढविली होती आणि याचा दाखला आजही देण्यात येतो.
सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत वेळेचे योग्य नियोजन करून ते आमलात आणावयास हवे. एखाद्या महत्वाच्या कामाकरिता तर मुळीच दिरंगाई करता कामा नये. जसे, परीक्षेचा अथवा नोकरीचा अर्ज भरावयाचा आहे. त्यास मुदत काही दिवस शिल्लक असली तर आपण आहे अजून वेळ, करू नंतर म्हणून दुर्लक्ष करतो. असे करता करता मुदत संपायची वेळ जवळ येते. त्यात मधेच एखादे आकस्मिक काम आले तर आपलीच फजिती होते. त्याकरीता वेळ असतांनाच अशा महत्वाच्या कामांचा निपटारा करणे कधीही योग्य.
वेळच्या वेळी जेवण आणि झोप ह्या दोन गोष्टींचा नियम पाळणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. ह्या दोन गोष्टींच्या वेळा चुकल्या तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
कुणाला भेटीची वेळ दिली असेल, एखाद्या कार्यक्रमाला जायचे तर दिलेल्या वेळेत त्याठिकाणी हजर व्हावयास हवे. आपण उशिराने त्याठिकाणी पोहोचलो तर आपल्या बेशिस्तीचेच प्रदर्शन होते. एखाद्या वेळी कार्यक्रमच संपलेला असतो अथवा भेटीची वेळ दिलेला व्यक्ती वाट पाहून कंटाळून निघून गेल्याने आपले नुकसानही होऊ शकते.
ह्या सर्व गोष्टी कुणाला माहित नाही असे नाही. मात्र तरीही प्रत्येकाकडून वक्तशीरपणा पाळला जात नाही हेही सत्य आहे. आपला देश तर जणू कोणत्याही बाबतीत दिलेली वेळ न पाळण्यासाठीच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कुठलेही काम दिलेल्या वेळेपेक्षा उशिरानेच होणार असे गृहीत धरून ‘इंडियन टाईमनुसार’ अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र, आपण वक्तशीरपणाचे पालन करून ही म्हण खोटी ठरवू शकतो.