वसईचा किल्ला

वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे.

रचना
तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे.
किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे.

किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.

बुरूज
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती.

बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरूंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.