विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प 

RAIL
रेल्वे अर्थसंकल्पाने सर्वस्तरातील जनतेला न्याय दिला आहेत. रेल्वेच्या विकासाला चालना देणारा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय उपयुक्त ठरणारा असून रेल्वेला भविष्यात कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होऊ शकतील. शेतकऱ्यांचा विचार करता शेतमालासाठी वातानुकूलित गोडाऊन उभारण्यात येणार आहेत. येत्या 5 वर्षांत रेल्वेचा कारभार पेपरलेस करतानाच महिलांच्या सुरक्षिततेसाठी 4 हजार आरपीएफ महिला कॉन्स्टेबलची भरती करण्याचा निर्णय निश्‍चित स्वागातार्ह आहे. मुंबईहून सुटणारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन म्हणजे रेल्वेच्या गतीमान कारभाराची नवीन सुरुवात आहे. 

केंद्र सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्राला भरघोस लाभ झाला आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर-गदग, सोलापूर-तुळजापूर रेल्वेमार्गांची घोषणा करण्यात आली आहे. सुरक्षितता, प्रवाशांसाठी सुविधा व स्वच्छता, नवीन प्रकल्प जाहीर करण्याऐवजी जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक – खासगी भागीदारी, थेट परकीय गुंतवणुकीच्या उपायांमुळे विकासाला चालना मिळेल. रेल्वे विद्यापीठ, प्रमुख शहरे जोडणारा डायमंड क्वाड्रिलॅटरल, बुलेट ट्रेन, नऊ मार्गांवर अतिवेगवान गाड्या यांच्या माध्यमातून रेल्वेची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्रासाठी नव्या 15 गाड्या, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईत दोन वर्षांत 864 ईएमयूची उपलब्धता यामुळे वाहतूक क्षमता 30 टक्‍क्‍यांनी वाढेल. नवीन रेल्वेमार्ग, हायस्पीड ट्रेनच्या बाबतीतही महाराष्ट्राला झुकते माप मिळाले आहे.