विजयादशमी

imagesउद्या दसरा, म्हणजेच विजयादशमीचा सण! हिंदू धर्मात विजयादशमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण असत्यावर सत्याच्या, अधर्मावर धर्माच्या विजयापित्यर्थ साजरा केला जातो. ह्या सणाबाबत तीन आख्यायिका मांडण्यात येतात,

पहिल्या आख्यायिकेत, जेव्हा महिषासुराने संपूर्ण सृष्टीवर हाहाकार माजविला. धर्म संकटात सापडला, देव-देवादिक, साधू-संत, सामान्य प्रजेचे जगणे मुश्कील झाले. त्यावेळी सर्व देवांनी शिवपत्नी पार्वतीची आराधना केली. पार्वतीने दुर्गेचे रूप धारण करून महिषासुराचा नाश करण्याचे ठरविले. नऊ दिवस चाललेल्या ह्या युद्धाची अखेर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या वधाने झाली.

दुसऱ्या आख्यायिकेत, रामायणात प्रभू श्रीराम आणि लंकापती रावण यांच्यात माता सीतेच्या अपहरणावरून झालेल्या युद्धाची सांगताही दसऱ्याच्या दिवशीचीच झाली होती. प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी मावळत्या सूर्याच्या साक्षीने लंकापती रावणाचा वध केला आणि सीता मातेला मुक्त केले. प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयाच्या आठवणी जगाविण्याकरीता ह्या दिवशी रावण दहनाचेही आयोजन करण्यात येते.

तिसऱ्या आख्यायिकेत, महाभारतात द्यूत क्रीडेत पराभूत झाल्यावर पांडवांना आपले राज्य, सर्व संपत्ती गमवावी लागली होती. एवढेच नव्हे त्यांना वनवासहि भोगावा लागला होता. वनवासादरम्यान त्यांना आपले क्षत्रियत्व लपवावे लागणार होते. त्याकरीता अत्यंत साधी वस्त्र परिधान करून कुठल्याही शस्त्रांवीना पांडवांना वनवासात गेले. त्यावेळी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. हि शस्त्रे पांडवांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर बाहेर काढून त्यांचे पूजन केले होते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनही केले जाते.

दसरा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने ह्या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ, वाहन वा इतर वस्तू खरेदी, सोने खरेदी करण्यासही चांगला मानला जातो. विद्यार्थी ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून विद्याप्राप्तीकारीता आराधानाही करतात. तर सायंकाळी सीमोलंघन करून सोने वाटून म्हणजेच आपट्याची पाने वाटून पारंपारिक पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जातो.

विजायादशमीचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अनिष्ट दूर करो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना! आपण सर्वांना ‘m4मराठी’च्या परिवाराकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3 Comments