विद्यार्थीदशेत मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी……

imagesसध्याचे जीवन फारच धकाधकीचे आहे. विद्यार्थ्यांपासून, नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपती कुणाजवळही स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सारखी आपली धावपळ! त्यात विद्यार्थीदशा म्हणजे ज्ञानाबरोबरच शरीराच्याही जडण-घडणीचा काळ. ह्याकाळात शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही, चांगला आहार-विहार घेतला नाही तर शरीरावर याचे विपरीत परिणामही भविष्यात घडू शकतात.

विद्यार्थ्यांमागे सारखी शाळा-कॉलेज, ट्युशन-क्लास, प्रात्यक्षिक यांची भाऊगर्दी असल्यामुळे ते घरापेक्षा अधिक वेळ बाहेरच असतात. त्यामुळे पालकांनाही मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे मुश्कील होऊन बसते. हे सर्व जरी खरे असले, तरीही ह्याच काळात त्यांच्या आरोग्याकडे ‘विशेष लक्ष’ द्यायला हवे. रोजच्या धावपळीमुळे त्यांच्या कोवळ्या शरीरावर ताण पडतो. त्यांना मानसिक-शारीरिक विश्रांतीचीही गरज असते. त्याकरीता योग्य वातावरण निर्माण करणे पालकांच्या हाती असते.

घरातील वातावरण आल्हाददायक ठेवावे. वादग्रस्त विषयांवरील चर्चा अथवा वाद मुलांसमोर करणे टाळावे. त्यांच्या अभ्यासाविषयी चौकशी जरूर करावी, त्याचबरोबर जमेल तेव्हा त्यांच्याशी अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवरदेखील चर्चा करावी. त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.

आजकालची मुले घरून बाहेर पडतांना खाण्याचे टाळून बाहेरच काहीतरी ‘जंकफूड’ वगैरे खाणे पसंत करतात. मात्र, अशा अन्नात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा जंकफूडच्या गुणवत्तेची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे जितके जास्त घरचे अन्न त्यांना देता येईल तितके द्यायला हवे. शीतपेय अथवा बाहेर मिळणाऱ्या इतर पेयांची त्यांना सवय लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशा पेयात शरीरास हानी पोहोचविणारे रासायनिक घटक असल्याचे अनेक चाचाण्यातून सिद्ध झाले आहे. त्याऐवजी त्यांना दुध पिण्याची सवय लावायला हवी. कारण, दुधामध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे सर्वच घटक समाविष्ट असल्याने त्याचा शरीराला योग्य फायदा मिळतो. यामुळे मुलांची बुद्धीदेखील तल्लख राहण्यास मदत होईल.