व्यसनामुळे ओढवते नामुष्की…..!

indexअमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष चक्क आपल्या पत्नीला घाबरतात यावर कुणाचा विश्वास बसेल? मात्र हे खरं आहे! हे त्यांनी स्वतः संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान कबुल केलं आहे. याचे कारणही तसेच आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांचे सिगारेटप्रेम तसे जगजाहीरच. कित्येकदा ओबामांना पत्रकार परिषदेदरम्यानही ह्या संदर्भातील प्रश्नाला सामोरे जावे लागले. त्यांच्या ह्या सिगारेट पिण्याच्या व्यसनाचा त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना भारी तिटकारा. त्यांच्या मुली मोठ्या होत असतांना न राहून त्यांनी ओबामांना ‘आता मुलींसाठी तरी सिगरेट सोडा’ अशी तंबीच दिली. शेवटी न राहवून बराक ओबामांना आपल्या पत्नीला घाबरून का होईना मात्र सिगारेट च्या व्यसनावर पाणी सोडावे लागले!

अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या अध्यक्षालादेखील केवळ व्यसनापायी आपल्या पत्नीला घाबरावे लागत असेल यावरून व्यसन हि किती वाईट आणि नामुष्कीजनक बाब आहे हे लक्षात घेतले पाहिजे! धुम्रपान असो वा मद्यपान अथवा इतर कुठलेही घन व्यसन, हे करणाऱ्यावर अशाप्रकारची नामुष्की ओढवून येणे हे निश्चित! आणि शरीराची होणारी हानी ती वेगळीच!

व्यसनी माणसाची समाजात खूप काही चांगली प्रतिमा असते असे समजण्याचे काही कारण नाही. कदाचित तोंडावर चांगले बोलणारे बरेच मिळतील, मात्र मागाहून बोटे मोडणारे त्याहून जास्त! व्यसन सोडण्याचे आवाहन करणाऱ्या अनेक जाहिराती आल्या, गुटखाबंदी झाली, मद्याच्या व इतर व्यसनाच्या पदार्थांच्या किमती अव्वाच्या-सव्वा वाढल्या, मात्र शौकीन कमी न होता दिवसागणिक वाढतच आहेत. व्यसनामुळे शरीराची होणारी हानी आणि स्वतःहून ओढवून घेतलेला मृत्यू याची जाणीव करून देवूनही जर व्यसन सुटत नसेल तर निदान कुटुंबात, समाजात आपला मान, प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी, आपल्याकडे चार लोकांनी चांगल्या नजरेने पाहण्यासाठी वा आपल्याबद्दल इतरांनी चांगला विचार करावा असे वाटत असेल तर निदान यासाठी तरी व्यसनापासून दूर राहिले पहिजे! व्यसनामुळे पत्नीला घाबरण्याची नामुष्की आलेल्या बराक ओबामांसारखी स्थिती अन्य कुणाची व्हायला नको!

One Comment