व्यायामाला पर्याय नाही

exercise 1सध्या सर्वच क्षेत्रात कामाचं स्वरूप बदललं आहे. ठरावीक वेळी काम आणि उरलेला वेळ स्वत:साठी राखून ठेवणं हे नियोजन आता करता येत नाही. बहुतांश क्षेत्रात कामाच्या वेळा वाढल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांना ऑफिसमध्ये दैनंदिन कामात वाढत्या ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. सततचे बैठे काम, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, व्यसनं, कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी असणारा दबाव आणि त्यातून वाढणारा ताण या सार्‍याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम न झाले तरच नवल. त्याबाबत वेळीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे ठरत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वजनावर नियंत्रण असणे. सततचे बैठे काम आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम वजन वाढण्यात होतो. वाढणारे वजन अनेक समस्यांना जन्म देते हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी नियमित व्यायाम, वेळेवर आणि सकस आहार हे उपाय गरजेचे आहेत. अलीकडे अनेकांना वारंवार अँसिडिटीचा त्रास जाणवत असल्याचे दिसते. हल्ली कामाच्या धावपळीत समोर येईल ते खाल्ले जाते. त्या वेळी आपण काय आणि किती खात आहोत, याचेही भान नसते. त्यामुळे शांतपणे आणि आवश्यक तेवढाच आहार घ्यायला हवा. हल्ली तरुणांमध्येही रक्तदाबासारखे विकार जडल्याचे दिसून येत आहे. आहारात मीठाचे अधिक प्रमाण, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, मानसिक ताण ही या मागील प्रमुख कारणे आहेत. वास्तविक चालणे, पोहणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम केवळ हृदयासाठीच उपयुक्त नाहीत तर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. आनंदी आणि समाधानी जीवन हा यशाचा मूलमंत्र ठरतो. या न्यायाने ऑफिसमधील कामाचा कितीही ताण असला तरी आनंदी राहण्याचा प्रय▪करावा. त्याला जीवनशैलीतील योग्य बदलांची जोड मिळाल्यास आरोग्यदायी जीवनाचा आनंद घेता येईल.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *