व्हॅलेन्टाईन डे आणि मराठी मन…

आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्‍यांसाठी या दिवसाच महत्व तितकस नसत. जगभरात व्हॅलेन्टाईन डे सर्वांचा सर्वांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्ह्णून साजरा केला जातो आणि आपल्या देशात तो प्रेमाचा दिवस कमी आणि प्रेमिकांचा दिवस म्ह्णूनच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्याला काही संस्कृती रक्षकांचा विरोध असतो तो त्यांच्या दृष्टीने विचार करता योग्यच म्ह्णावा लागेल. आपल्या देशात प्रेमविवाहांच भविimagesष्य काही ठिक दिसत नाही त्याला सर्वाधिक हा व्हॅलेन्टाईन डेच कारणीभूत असावा की काय अशी शंका ही कधी कधी मनात आल्यावाचून राहात नाही कारण आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूणाईला अशा एखाद्या दिवसाची माध्यम म्ह्णून जर गरज भासत असेल तर त्यांच प्रेम किती तकलादू आहे याची सहज कल्पना करता येते.

व्हॅलेन्टाईन डे जवळ आला की नवोदित साहित्यिकांमधील साहित्य प्रतिभेला अचानक मोहोर येतो असा गैरसमज ही आपल्या देशात पसरलेला दिसतो कारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास प्रेम या विषयावरील साहित्याची मागणी अचानक वाढलेली दिसते. या काळात बर्‍याच नवोदित कविंना आणि  लेखकांना त्यांचे  साहित्य प्रकाशित करण्याची संधी लाभत असते. या दिवसात प्रेमकवितांना सुगीचे दिवसच आलेले असतात असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. प्रेम कविता हा कवी आणि वाचकांसाठीही या दिवसात जिव्हाळ्याचा विषय असतो. मराठी कवितांचा विचार करता मराठी प्रेमकवितांना मिळणार्‍या वा ! वा ! समोर इतर सामाजिक विषयावरील कवितांना मिळणारी वा ! वा ! नगन्यच असते. आजच्या मराठी साहित्यात सामाजिक विषयांवरील कवितांच्या तुरळक गारा पडताना दिसतात त्याविरूध्द प्रेम कवितांचा धो-धो पाऊस कोसळ्ताना दिसतो. प्रेम या विषयावर कविता लिहायची म्ह्टली की प्रत्येकात दडलेला कवी अचानक जागा होत. त्याला हे व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस प्रोत्साहनच ठरत असतात.

माझा व्हॅलेन्टाईन डेला विरोध आहे असं मी म्ह्णूच शकणार नाही कारण माझी पहिली कविता एका वर्तमानपत्रात  व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच प्रकाशित झाली होती, ती का ? कशी ? वगैरे विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी मी ही प्रेमात पडल्यावर जे कवी होतात त्यांच्यापैकीच एक कवी होतो कदाचित असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुढे माझी कविता प्रेमाची धुंदी उतरल्यावर प्रगल्ब झाली आणि मग माझ्यातील कवी खर्‍या अर्थाने घडत गेला असावा. व्हॅलेन्टाईन डे वर एखादी कविता आणि एखाद लेख लिहण्या पलिकडे माझी मजल कधीच गेली नाही. व्हॅलेन्टाईन डे हा माझा फर आवडीचा विषय असा कधीच नव्हता आणि नाही. सुरूवातीला आपल्या देशात व्हॅलेन्टाईन डे ला होणारा विरोध आता बर्‍यापैकी मावळलेला दिसतोय. कोणत्याही गोष्टीचे होणारे संभाव्य परिणाम त्या गोष्टीच महत्व ठरवत असतात. आता आपला समाज प्रेमाच्या बाबतीत इतका मोकळा होत चाललाय की हळू हळू व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस साजरे करण्याचे स्वरूपही बदललेल दिसेल . पूर्वी व्हॅलेन्टाईन डे ला भेट म्ह्णून दिल्या जाणार्‍या गुलाबाची जागा आता हिर्‍याच्या दगिण्यांनी घेतलेली दिसतेय. आता काही वर्षांनी व्हॅलेन्टाईन डे ही आपल्या देशात रक्षाबंधन आणि भाऊबिजेसारखा साजरा केला गेला नाही म्ह्णजे मिळविली. व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने कोसळणारा मराठी प्रेमकवितांचा पाऊस रंग बदलून इंग्रजीत कोसळायला लागला तर ? विचार करूनच माझ्या मराठी मनात धडकी भरतेय…