सचिनचा शेवटचा ऐतिहासिक कसोटी सामना मुंबईतच….
|२४ वर्षे क्रिकेटची सेवा केलेल्या सचिन तेंडूलकरचा अखेरचा २००वा कसोटी सामना त्याने केलेल्या मागणीनुसार मुंबईतच खेळविण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. हा सामना १४ ते १८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडीयम वर खेळविण्यात येईल. महान खेळाडू सचिन तेंडूलकरच्या दैदिप्यमान आंतरराष्ट्रीय कारगीर्दीतील हा अखेरचा सामना असल्याने तो ऐतिहासिक तर असेलच, मात्र सचिनचा हा २००वा सामना असल्याने त्याला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. आजवर जगात कुठल्याही खेळाडूने २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केलेला नाही. म्हणजे जाता-जाता विक्रमी २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही विक्रमादित्य सचिन तेंडूलकर आपल्या नावे करून जाणार हे निश्चित.
दरम्यान हा सामना मुंबईत खेळविण्याची विनंती करण्यामागे सचिनने आपले मातृप्रेम दडल्याचेही सांगितले. आजवर सचिनचा कुठलाही सामना त्याच्या आईने मैदानात बसून पाहिलेलो नाही. वार्धक्याने प्रवास निषिद्ध असलेल्या आपल्या आईला निदान अखेरचा कसोटी सामना तरी मैदानात बसून बघता यावा यासाठी सचिनने तो मुंबईत खेळविला जावा अशी अपेक्षा बी.सी.सी.आय.कडे व्यक्त केली. त्याच विनंतीला मान देऊन दुसरी कसोटी मुंबईत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.