सचिन आणि राहुलच्या टी-२० क्रिकेट कारगीर्दीची सांगता….

a80f719c-2e6c-4b7b-bb83-a09deb4e6fe5HiResचॅंपियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३३ धावांनी विजय मिळवून मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली. हा सामना केवळ एवढ्याकरताच संस्मरणीय ठरणार नसून भारताचे दोन महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड यांनी IPL-टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने त्यांच्या कारगीर्दितील शेवटचा सामना म्हणूनही ओळखला जाईल!

     सचिन आणि राहुल ह्या दोघांची संपूर्ण क्रिकेट कारगीर्द कुठल्याही खेळाडूला आदर्श वाटावी अशीच आहे. त्यातही ‘केवळ तरुणांचाच गेम’ अशी ओळख असलेल्या ‘टी२० क्रिकेट’ प्रकारात त्यांनी IPL आणि चॅंपियन्स लीग मध्ये ज्या खेळाचे प्रदर्शन केले, ते आजच्या युवाखेळाडूंना निश्चितच प्रेरणादायी ठरेल! टी-२० क्रिकेट प्रकारात खेळतांना जोश आणि क्षमता ह्या दोघांचा उत्तम संगम असावा लागतो. सचिन-राहुलसारख्या वयस्क खेळाडूंमध्ये तो असेल कि नाही याबद्दल अनेकांना साशंकता वाटत होती. मात्र त्या दोघांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! ‘जंटलमन्स गेम’ अशी ओळख असलेल्या क्रिकेट खेळातील सचिन आणि राहुल हे खरोखर ‘जंटलमन’ खेळाडू आहेत असेच त्यांच्या एकंदर कारगीर्दीवरून सिद्ध होते!

    ह्या स्पर्धेत सचिनने क्रिकेट कारगीर्दित ५० हजार धावांचा टप्पा ओलांडून आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला. तर राहुलच्या नावावरही कारगीर्दित ४१ हजारांहून अधिक धावा जमा आहेत. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही कसोटी क्रिकेट मध्ये अद्याप तो भारताचे प्रतिनिधित्व करीत असून सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळण्याच्या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तर राहुलच्या क्रिकेटकारगीर्दीची यानिमित्ताने सांगता झाली. मात्र, राहुलवर संघाची धोरणात्मक जबाबदारी सोपविण्यात यावी असे त्याच्या राजस्थान रॉयल्स संघातील अनेक खेळाडूंचे मत आहे.