“ सत्कृत्य ”

nice job‘सत्क्तृत्य’ म्हणजेच चांगले कृत्य! असे कृत्य की जे केल्याने आपण कुणाला तरी मदत केल्याचे समाधान मिळते. आपण कुणाच्यातरी काहीतरी कामात आलो याचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते. हे सत्कृत्य करण्यासाठी वेगळा काही वेळ द्वावा लागेल असेही नाही. आपण आपले काम करत असतांना, कुठेतरी फिरायला गेलेलो असतांना अथवा प्रवास करत असतांनाही सत्कृत्य करू शकतो.

जसे एखाद्या लहान मुलाला, वृद्ध व्यक्तीला अथवा अंध-अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करणे. एखादा हमाल जर हातगाडीवरून ओझे वाहून नेत असल आणि रस्त्यात चढ लागल्याने त्याचे एकट्याचे बळ कमी पडू लागलेतर त्याला तेवढी चढ चढण्यास नक्की मदत करावी. कारण दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडलेल्या त्याच्या कुटुंबाला त्या हमालाला रोज मिळणाऱ्या मिळकतीशिवाय दुसरा पर्याय नसतो. आपण कुठलीही लाज न बाळगता त्याला थोडीशी मदत करण्यास काय हरकत आहे? रस्त्याने चालतांना एखादा काटा अथवा ठेच लागून इजा होऊ शकणारा दगड जर आपल्याला आडवा आला तर तो इतर कुणाला इजा करणार नाही ह्या उद्देशाने बाजूला सारावा.

ही ‘सत्कृत्ये’ उदाहरणादाखल दिलेली आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण आपले दैनंदिन काम करता-करता सहज करू शकतो आणि त्याने कुणालातरी मदत होऊ शकते. मदत म्हणजे नुसते पैसे किंवा वस्तुरुपतच असावी असे नाही. असे किमान एकतरी सत्कृत्य रोज आपल्या हातून झाले पाहिजे असा निश्चय मनी करायला हवा!