साखर भात

साहित्य

दोन वाट्या वासाचा तांदूळ घावा.

अडीच वाटी साखर,

अधी वाटी तूप,

पाच-सहा लवंगा,

काजू किंवा बदामाचे तुकडे दोन चमचे,

बेदाणे दोन चमचे,

वेलदोडा पूड एक मोठा चमचा,

खाण्याचा केशरी रंग,

थोडेसे असल्यास केशर घावे.

कृती
प्रथम तांदूळ धुऊन कोरडे करण्यास ठेवावे. एकीकडे भातासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करण्यास ठेवावे. दुसऱ्या गॅसवर पाव वाटी तुपावर लवंगा परतून घ्याव्यात. तांदूळही परतावेत. नंतर गरम करण्यास ठेवलेले उकळते पाणी भातात ओतावे.

किचित चवीपुरते मीठ घालून भात मोकळा शिजवावा. तो परातीत गार करण्यास ठेवावा. नतर पातेल्यात साखरेत पाव वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावे. साखर पाण्यात विरघळेपर्यंत हलवावे. पाक पक्का झाला की त्यात खाण्याचा रंग चिमूटभर, केशराची पूड पाव चमचा, काजूचे तुकडे, बेदाणे घालून भात घालावा. त्यावर वेलदोड्याची पूड टाकून मंद गॅसवर वाफ येऊ द्यावी.

भात घातल्यावर पाक पुन्हा थोडा सैल होतो. भात झाला की खाली तवा ठेवून पाच मिनिटे गॅसवर ठेवावा. म्हणजे बराच वेळ गरम राहील. सर्व भात शिजल्यावर वरून पाव वाटी साजूक तूप सोडावे व झाकून ठेवावा.

काजू किंवा बदाम नसल्यास नारळी किंवा साखरभातात (sakharbhat) घालण्यासाठी दोन डाव शेंगदाणे तासभर भिजत घालावेत. त्याची साले सुटल्यावर चार चार तुकडे करून काजूऐवजी घातले तरी छान भात लागतो.

सकाळचा पांढरा भात मोकळा झाला असेल व तो जास्त राहिला तर संध्याकाळच्या जेवणात त्याचा नारळीभात किंवा साखरभात केला तरी छान लागतो. पद्धत सर्व वरीलप्रमाणेच, फक्त तो भात तुपावर शिजलेला असल्याने व त्यात लवंगा नसल्याने वेलदोड्याच्या पुडीबरोबर चार लवंगा कुटून घालाव्यात.