सायबर क्राईम
|कोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच विचार गरजेचा ठरत आहे. अलीकडे सायबर सुरक्षितता ही गंभीर तसेच चिंताजनक बाब ठरत आहे. याचे कारण संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता आणि त्या संबंधी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीची माहिती मिळवणे तसेच त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे ठरत आहे. हॅकर्स विविध उद्देशांसाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहेत. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश होतो. अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरी भागांबरोबर निमशहरी तसेच ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशा वेळी संगणक वापरणार्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.