सौंदर्य पायांचे

leg care 1महिला चेहर्‍याच्या सौंदर्याकडेच सर्वाधिक लक्ष देताना दिसतात; पण त्याच वेळी पायाच्या सौंदर्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. दहा जणींमध्ये एखाद्याच स्त्रीचे पाय नितळ आणि मुलायम असतात. बहुतेक जणींच्या पायाला भेगा असतात तसेच ते कोरडे आणि रुक्ष असतात. विशेषत: वाढत्या वयाच्या खुणा पायांवर लगेचच जाणवू लागतात. यासाठी पायांची निगा राखणेही अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सहज करता येण्याजोगे अनेक उपाय आहेत. तळपाय तसेच संपूर्ण पायांना चांगल्या तेलाने हळुवार मसाज करावा.

यासाठी तिळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल उत्तम असते. थंडीमध्ये पायमोजांचा अवश्य वापर करावा. कोमट पाण्यात थोडे कोलन वॉटर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्यास शीण आणि थकवा नाहीसा होतो. याबरोबरच लिंबाचा रस किंवा व्हिनेगरमध्ये दही मिसळून ते पायांना चोळावे. १५ मिनिटांनी पाय धुवून टाकावेत. यामुळे पायांची कोरडी झालेली त्वचा मऊ होते. ग्लिसरिन आणि बदाम तेल याच्या वापरामुळेही पाय मुलायम आणि चमकदार राहतात. अंगातील उष्णता वाढल्यास तळपायांची तसेच डोळ्यांची आग होते. यासाठी तळपायांना मेंदी लावल्यास आराम मिळतो. याबरोबरच पायांसाठी आवश्यक व्यायामही करावेत. समुद्रफेसाच्या दगडाने टाचा घासाव्यात. त्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.