स्वप्नातील धनाचा शोध……

5002324126576805967_Orgएका साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेऊन उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामधील दौडिया खेडिया गावात सध्या खजिन्याच्या शोधार्थ उत्खनन सुरु आहे. आणि हे उत्खनन कुणी खाजगीत करत आहे असेही नाही, तर भारतीय पुरातत्व खात्याकडून हे उत्खनन केले जात आहे. ह्या गावातील साधू बाबा यांच्या स्वप्नात अवधचे तालुकदार राजा रामबक्षसिंह जे १८५७ च्या उठावात सहभागी झाल्यामुळे इंग्रजांनी ज्यांना फाशी दिले त्यांनी बाबांना सांगितले की, ‘राजवाड्यात एक हजार टन सोनं पुरून ठेवलं असून सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी केंद्रसरकारकडे ते सुपूर्द कर.’ त्यानंतर बाबांनी पंतप्रधानांना पत्र लिहुन तसे कळविले. त्यानंतरच भारतीय पुरातत्व खाते उत्खननाच्या कामाला लागले.

ह्या बाबांचे स्वप्न जर खरे ठरले तर संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होईल, मात्र खरेच अशा स्वप्नांवर किती विश्वास ठेवावा? ह्या उत्खननाला प्रसिद्धीमाध्यमातूनही मोठी प्रसिद्धी मिळते आहे. हि प्रसिद्धी अंधश्रद्धावाढीस खतपाणी घालणारीच ठरत आहे. अशी स्वप्नं जर खरी ठरायला लागली तर लोकांचा कर्तृत्वावर विश्वास कसा राहील?

हे स्वप्नं अंधश्रद्धा मानून सरकारने त्याकडे दुर्लक्ष जरी केलं असतं, तरी कथित खजिना दडवून ठेवलेला पडक्या राजवाड्याचा परिसर आणि बाबांच्या जीवाला धोकाही उद्भवू शकला असता. आजवर गुप्तधन मिळविण्यासाठी लोक कुठल्या थराला जातात याच्या बातम्या अधून मधून कानावर येतच असतात. हे गुप्तधन मिळविण्यासाठी काही अपप्रवृत्त्तींनी बाबांना ओलीस धरून त्या राजवाड्याच्या परिसरात स्वतःच उत्खनन सुरु केले असते. यातून ते गाव आणि बाबा दोघेही संकटात सापडले असते. त्यामुळे धन मिळो अथवा न मिळो, पुरातत्व खातेच याचा सोक्षमोक्ष लावेल हे एकअर्थी बरेच झाले!

One Comment