हा तर मतदारांनाच NOTA

nota१७ तारखेला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मतदान करायला गेलेल्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळू शकला नाही,हजारो लोक ह्या पासून वंचित राहिले.

मतदारांकडे मतदानाच ओळखपत्र तर आहे मात्र निवडणुकीच्या यादीतून त्याचं नावच हद्दपार झाल्याची खळबळ उडाली आहे.
एक नव्हे तब्बल लाखाच्या आसपास मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही.
पुण्यातल्या मतदार याद्यांमधून नावे गायब करण्यात आल्यानं हजारो  पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावे लागले. या निषेधार्थ पुणेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.महत्वाचं म्हणजे यावेळी मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १३ टक्क्यांची  वाढ  नोंदवण्यात आली. असं असलं तरी पुण्यातले हजारो मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत. मतदार यादीतून त्यांचं नाव अचानकपणे गायब झाल्याची त्यांची तक्रार आहे. मतदारांची नावं  मतदार यादीतून गायब होण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीचे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलाय.

दरम्यान, पुण्याच्या मतदान यादीसंदर्भातल्या या घोळाप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनीही जिल्हाधिका-यांची भेट घेतली. पुण्यात अनेकांना मतदान करता आलं नाही, हे त्यांनी मान्य केलं मात्र काँग्रेसचं यामागे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.