ह्याचे भान जरासे राहू द्या…..!

t
‘निळ्या नभातून घुमू लागली जय भारत ललकारी….स्वातंत्र्याच्या उत्सवास हो कळस चढे सोनेरी” १५ ऑगष्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा उदय.इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा अनुभव आज आपण घेत आहोत मस्त-मजेशीर आयुष्य जगत आहोत.मनाला वाट्टेल ते करीत आहोत आपल्या पद्धतीने जगत आहोत.मात्र ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून आपल्याला हे सुख दिल त्यांची आठवण आपल्याला फक्त आजच्याच दिवशी यावी?आजच्याच दिवशी आपल देशप्रेम उतु जावं ?आजचं आपल्याला बलिदानाची जाणीव व्हावी?…….किती बदललोय आपण.!किती स्वार्थी आणि एकटे झालो आहोत आपण ? हा देश माझा आहे,हि लोकशाही माझी आहे,इथला प्रत्येक घटक माझा आहे हि बांधिलकी कुठे गेली? स्वातंत्र्याची साठी ओलांडून गेली मात्र आपण स्वातंत्र्यासाठी काय केलं?ह्याची उत्तर अजूनही अनुत्तरीतचं…”सारे जहा से अच्छा,हिंदोस्ता हमारा” असं मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण?पण त्याची कितपत काळजी घेतो ह्याचा विचार केलाय कधी?
अहो ह्या देशाला प्रगतशील म्हणावं तरी कसं ? इथला प्रत्येक घटक स्वताला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतोय..! या देशात दंगली घडविण्यासाठी बॉम्ब टाकण्याची गरज नाही कारण या देशात नुसत्या अफवांवर दंगली घडतात हे वास्तव नाकारून चालणार नाही.खूप अपेक्षा होत्या महापुरुषांच्या स्वातंत्र्याकडून मात्र त्या धूळीला मिळाल्या आहेत.तसा हिशेब बराच मोठा आहे तो प्रत्येकाने तपासला पाहिजे…..आणि भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा केवळ अन केवळ भारतीयच आहे.हि खुणगाठ प्रत्येकाने बांधून घेतली पाहिजे कारण हा देश कुण्या एका व्यक्तीचा,धर्माचा वा जातीचा नाही….पक्ष,प्रांत,वर्ण,धर्म,ह्या चौकटीतून बाहेर अगळी वेगळी ओळख ह्या देशाची आहे.त्यामुळे हा देश माझा ह्याचे भान जरासे राहू द्या रे………