21 लाख 24 हजार मुले शिक्षणापासून वंचित

shala

शिक्षणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 21 लाख 24 हजार मुले शिक्षणापासून वंचित असल्याची धक्‍कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे 2010 पासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानंतरही राज्यात 8 लाख 28 हजार मुले शिक्षणापासून दूर राहिली आहेत. 

महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे म्हटले जाते. गाव तेथे शाळा आहे. शहरांमध्ये सरकारी, खासगी शाळा आणि कॉन्व्हेंटची संख्या वाढत चालली. असे असताना दुसरीकडे शाळेपासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड वाढली आहे. नागपुरातील संघर्ष वाहिनी या संस्थेने राज्यात केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 21 लाख 24 हजार मुले शिक्षणापासून वंचित असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली. ही आकडेवारी केवळ आठ वर्षांतील आहे. 2011 च्या जनगणनेच्या आधारावर ही आकडेवारी काढण्यात आली. 2006 ला एकूण जन्माला आलेली मुले आणि पाच वर्षांनी पहिल्या वर्गात असलेली मुले यात मोठी तफावत आढळून आली. रस्त्याच्या कडेला आणि गावाच्या बाहेर असलेल्या वस्त्यांमधली मुलांचा यात समावेश आहे. यात भटके विमुक्‍त, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुलांची संख्या अधिक आहे. ही माणसे कुठल्या शहरात, कुठल्या भागात राहतात याची माहिती या सर्वेक्षणात दिली आहे. काही लोकांची नावेही यात लिहीण्यात आली आहे. स्थलांतर, बेरोजगारी, गरिबी, शिक्षणाची माहिती नसणे, आवड नसणे, शाळा जवळ नसणे, प्रशासनाचे दुर्लक्ष, आरोग्याच्या तक्रारी आदी कारणांमुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही. दरवर्षी सरकारी शाळेतील शिक्षक आसपासच्या परिसरातील गरीब मुलांनी प्रवेश करावा, यासाठी फिरतात. मात्र, पटसंख्या पूर्ण झाल्यावर त्यांचे फिरणेही थांबते. त्यामुळे अनेक अशी मुले असतात ज्यांना शिक्षण घेता येत नाही. केंद्र सरकारने 2009 मध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा आणला. तो एप्रिल 2010 मध्ये अमलात आला. यानंतर शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या घटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही 8 लाख 28 हजार मुलांना शिक्षण घेता आले नाही. राज्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या झाल्या. या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण सम्राट मोठे झाले. मात्र, समाजातील उपेक्षित घटकापर्यंत शिक्षण पोहोचलेच नाही. त्यामुळे राज्य शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर आहे, हा राज्य शासनाचा दावा फोल ठरतो. शिक्षणाचे केवळ बाजारीकरण झाले आहे, हेच यानिमित्ताने स्पष्ट होते. 

2 Comments