ब्रिटनला जायचंय? आधी दोन लाख चाळीस हजारांचा बोंड भरा….

uk ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अध्यादेशानुसार ब्रिटीश विजाकारीता भारतीय नागरिकांना दोन लाख चाळीस हजार रुपयांचा बॉंड द्यावा लागणार आहे. हा नियम आशिया व आफ्रिका खंडातील सहा देशांना लागू होणार आहे. ही पायलट योजना असून मुदतीपेक्षा अधिक काळ बेकायदेशिररीत्या वास्तव्य करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याकरीता ही योजना लागू केल्याचे ब्रिटीश गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ब्रिटनला प्रथमच भेट देणाऱ्या नागरिकांसह सर्व प्रकारच्या विजाकारीता ही योजना लागू होणार असून गुप्तहेर विभागाने केलेल्या तपासात दोषी ठरलेल्या इतर राष्ट्रांनाही ही योजना लागू पडेल. ही योजना लागू करतांना भारत हा अत्यंत धोकादायक देश असल्याचेही नमूद केले आहे.

मुळात, भारतीयांकडून ब्रिटनला काही धोका निर्माण होणे ही बाबच चुकीची वाटते. दीडशे वर्षे भारतावर राज्य केल्यानंतर ह्या देशाचे तीन तुकडे केल्यावरही भारताने ब्रिटनशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. ह्या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असतांनाच भावनिक नाळही जोडली गेली आहे. नुकत्याच ब्रिटीश राजघराण्यात जन्मलेल्या नवीन राजकुमाराचे भारतीय प्रसार माध्यमांनीही भरभरून स्वागत केले, करत आहेत. मात्र, तरीही ब्रिटनने उचलेले हे पाऊल नक्कीच भुवया उंच करायला लावते. ब्रिटीश राजकुमाराचे स्वागत करण्यात तत्परता दाखविलेल्या भारतीय प्रसार माध्यमांनीही काही अपवाद वगळता ही बातमी प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करावी हेही खेदजनक वाटते. भारतीय वाणिज्य मंत्र्यांनी आपली नाराजी जरी ब्रिटन शासनाला कळविली असली तरीही ही योजना भारतावर लागू न करण्यासाठी काही ठोस पाऊले सरकारने उचलायला हवीत. अन्यथा, भारताला भेट देणाऱ्या ब्रिटीश नागरिकांनाही किमान अडीच लाखांचा बॉंड लागू करण्याचा निर्णय घ्यावा.