म्हणूनच हॉटेल बंद पाडलं….!

राजकीय पक्षांनी घोटाळे करणं आता काही नवीन राहिले नाही, मात्र यावर कुणी टीका केली तर राजरोसपणे घोटाळेबाज नेत्यांची बाजू घेत थेट टीका करणाऱ्यावर चालून जाणे आणि त्यावर बंदी आणणे असा काहीसा निर्लज्जपणा प्रदर्शित करणारा प्रकार घडला. hotel_aditiसध्याच्या यु.पी.ए. सरकारच्या कारगीर्दीतील घोटाळे हा जनतेच्या मनात केंद्र सरकारविषयी संताप आणणारा विषय आहे. हाच संताप मुंबईतील ‘हॉटेल अदिती’ने ग्राहकांना द्यावयाच्या बिलावर ह्या घोटाळ्यांबद्दल नाराजी व्यक्त करणारा मजकूर छापून व्यक्त केला.

केंद्र सरकारने ए.सी. हॉटेलवरील करांत भरमसाट वाढ केली. याचा ह्या हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम दिसून आला. ‘धंद्याची खोटी’ होत असल्याचे पाहून परळमधील के.ई.एम. रुग्णालयासमोरील हॉटेल अदितीच्या मालकांना सरकारच्या ह्या धोरणावर संताप व्यक्त करावासा वाटला. यासाठी त्यांनी हॉटेलच्या बिलावर, घोटाळे करून जनतेचा पैसा खाणं ही मूलभूत गरज आहे तर, एसीमध्ये बसून जेवणं ही चैन आहे” – इति यूपीए सरकार असा मजकूर छापला. केंद्र सरकार टू-जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळ्यांसारखे हजारो करोड रुपयांचे घोटाळे करते आणि जनतेवर मात्र भरमसाट करवाढ करते असा संतापच ह्य मजकुराद्वारे हॉटेलमालकाने व्यक्त केला. मात्र, तेथील युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदवीत थेट हॉटेलवर मोर्चा नेला . असा मजकूर छापल्याने कॉंग्रेसची बदनामी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल मालकाविरुद्ध अब्रू नुकसानीचा गुन्हाही दाखल केला.

ही तर जनतेची गळचेपी झाली. जनतेचे तोंड दाबण्यापेक्षा सरकारने आपली प्रतिमा सुधारावी.कार्यकर्त्यांकरवी जनतेचा आवाज अशाप्रकारे दाबणे म्हणजे लोकशाहीची क्रूर चेष्टाच नाही का?