मुले शाळेतून आल्यानंतर

           शाळा सुरु होऊन आता जवळपास तीन आठवडे झाले आहेत.school एरवी शाळा नियमित भरायलाही लागल्या असतील. नवीन वर्ग, नवीन अभ्यासक्रम यामुळे मुलांना अभ्यासाबद्दल एक प्रकारचे कुतूहल असते. पालकही  काही वेळा काळजीपोटी की होईना मुलांना त्याच अभ्यासक्रमाबद्दल भीती दाखवून बळजबरीने अभ्यासाला बसायला लावतो. मात्र हे योग्य आहे का? निश्चितच नाही! मुलांना अभ्यास करायला सांगणे वाईट नाही, पण अभ्यासक्रमाची भीती दाखवून अभ्यासाला बसविणे घातक आहे. अशाने मुलांच्या मनात नवीन अभ्यासक्रमाविषयी जिज्ञासा निर्माण होण्याऐवजी भीतीच वाढत जाते. मग ते ह्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याऐवजी, शिकण्याऐवजी फक्त परीक्षेत पास होण्याकरीता किंवा चांगले गुण मिळविण्याकरिताच अभ्यास करतात. यामुळे मुले पुस्तकी किडे होण्याचा धोकाही अधिक असतो.
        आजच्या युगात पुस्तकी किडा असणे फार धोक्याचे आहे. हे युग स्पर्धेचे, माहितीचे, कौशल्याचे युग आहे. ज्याच्याकडे योग्य माहिती आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे कौशल्य असते त्याचीच ह्या जगात सरशी होते. त्यांच्यासमोर नुसते पुस्तकात घुसून दिवसभर घोकंपट्टी करणाऱ्यांचा निभाव लागणे कठीण! म्हणूनच मुलांना नुसते पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे.
                  त्यांच्याशी चर्चा करता येण्यायोग्य चालू घडामोडींविषयी चर्चा करावी. त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दलच्या समस्या जाणून घ्याव्यात. ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना इतर काही चांगल्या गोष्टीत रस असेल, तर त्याला त्यात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आठवड्यातून एक दिवस आपली सगळी कामे बाजूला सारून मुलांना वेळ देणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यावेळी त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेले तर अधिकच योग्य.

2 Comments