मिल्खा सिंगांचा जीवन यज्ञ : भाग मिल्खा भाग

मनात पक्का निश्चय असला आणि त्याला प्रयत्नांची जोड असली तरच अपेक्षित ध्येय साध्य करता येते. ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पाहिल्यावर ह्याचीच प्रचीती येते. हा चित्रपट थोर भारतीय ऑलंपिक धावपटू जीव मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारलेला आहे. bhag_milkha_bhag
देशाच्या फाळणीमुळे दुभंगलेल्या कुटुंबातून एकटे मिल्खा सिंगच सुखरूप बचावले. फाळणीनंतरच्या दंगलीत आईवडील गमावलेल्या मिल्खाचा त्यांच्या बहिणीने सांभाळ केला. रेल्वेतील कोळसा चोरून विकत, चाकूच्या धाकाने लहान-लहान चोऱ्या करीत ते लहानाचे मोठे झाले. पुढे किशोरवयात आल्यावर एका मुलीवर त्यांचे प्रेम जडले. तिच्याशी विवाहबंधनात अडकण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. त्यासाठी ते सैन्यात दाखल झाले. प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींची ६ कि.मी. धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात पहिल्या दहामध्ये येणाऱ्यांना राष्ट्रीय संघात सहभागी होण्याची संधी तसेच खास खुराक म्हणून दोन अंडी आणि एक पेलाभर दुध मिळणार होते. त्यावेळी ते धावले रोज दुध प्यायला मिळणार म्हणून आणि पहिले आले. त्यांच्यातील ‘धावपटू’ प्रशिक्षकांनी अचूक हेरला आणि योग्य मार्गदर्शन करत राहिले.
त्यानंतर मिल्खा धावले ‘ब्लेझर’साठी. राष्ट्रीय खेळाडूंना मिळणाऱ्या ब्लेझरचे त्यांना विशेष आकर्षण होते. असे ब्लेझर घालून ‘स्मार्ट सरदार’ म्हणून स्वतःला मिरविण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना जबर मारहाण केली. पायाला गंभीर दुखापत असूनही ते धावले आणि परीक्षकांची मने जिंकली. त्यांचे राष्ट्रीय संघात स्थान निश्चित झाले आणि त्यांना हवे असलेले ब्लेझरही मिळाले.
असेच लहानलहान ध्येय समोर ठेवत ते साध्य करत राहिले. राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यावर ते प्रेयसीच्या घरी तिचा रीतसर हात मागण्याकरिता  गेले. मात्र तिचे आधीच लग्न झाल्याने त्यांना हिरमुसले होऊन परतावे लागले. मग त्यांनी धावण्यावर लक्ष केंद्रित केले. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी १९५६च्या ओलम्पिक संघातही स्थान मिळविले. मात्र, विशेष ध्येय समोर नसल्याने त्यांचे मन भरकटले आणि एका परदेशी ललनेच्या जाळ्यात अडकत स्पर्धेत मागे पडले. सुवर्ण पदकाची आशा असलेले मिल्खा सिंग पात्रता फेरीतूनच बाहेर पडले. मग मात्र त्यांनी ध्येय निश्चित केले. ४००मि. धावण्याच्या स्पर्धेतील ४५.९ सेकंदांचा विक्रम मोडण्याचा इरादा त्यांनी पक्का केला. फ्रांस मधील स्पर्धेत त्यांनी ४००मि.ची शर्यत ४५.८ सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रमही केला.
पुढे १९५८च्या राष्ट्रकुल खेळात ४००मि. मध्ये सुवर्ण पदक, त्याच वर्षी आशियाई खेळात २००मी. आणि ४००मी. मध्ये सुवर्ण पदक, १९६२च्या आशियाई खेळात ४००मि. मध्ये सुवर्ण पदक मिळवून आपल्या कार्गीर्दीची विजयी पताका रोवली. १९६० साली पाकिस्तानात झालेल्या भारत-पाकीस्तान यांच्यात झालेल्या द्विराष्ट्री स्पर्धेत ‘आशियाई वादळ’ म्हणून परिचित असलेल्या  पाकिस्तानी पाकिस्तानी धावपटू अब्दुल खालिक सह सर्व धावपटूंना मागे सारत यश मिळविले. तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख जनरल अय्युब  त्यांचा ‘फ्लाईंग सिख’  देऊन केला. त्यांच्या यशाने प्रभावित होत पंतप्रधान नेहरूंनी त्यांच्या नावे एक दिवसीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यांच्या नावे राष्ट्रीय सुट्टी देण्याचे त्यांनी प्रेयसीला दिलेले वचनही त्यांच्या कर्तृत्वाने पूर्ण केले.
जीव मिल्खा सिंग हे खरोखरच एक महान क्रीडापटू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्यांनी मिळविलेले यश वादातीत आहे. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाची आम्हा भारतीयांना जाण नसणे निश्चितच स्वीकारार्ह नाही. त्यांच्या यशोगाथेची महती काही लोकांना माहित असली तरी आज भारतातील खूप मोठा जनसमुदाय त्यापासून वंचित होता हेच खरे! ह्या महान धावपटूचे महानत्व एका चित्रपटाच्या माध्यमातून आम्हा भारतीयांपर्यंत पोहोचले हे हि नसे थोडके!
एकदा तरी हा चित्रपट कुटुंबासह पाहून मिल्खा सिंगांच्या जीवन यज्ञातून प्रेरणा घ्यावी हीच अपेक्षा!