|| अतिथी देवो भव ||
|लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर भारत देशाच्या प्राकृतिक सौंदर्याचा पुरस्कार करणारे एक वाक्य लिहिलेले आहे, ‘धरती पार अगर काही स्वर्ग है, तो बस यही है! यही है! यही है!” आणि ह्याच स्वर्गाची अनुभूती घेण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी भारतभेटीवर येतात. ‘अतिथी देवो भव’ अशी संस्कृती लाभलेले आम्ही भारतीय त्या पर्यटकांचे स्वागत, आदरातिथ्य आणि आवश्यक सेवाही करतो. मात्र, काही विकृत प्रवृत्तींमुळे महिला पर्यटकांना त्रास सोसावा लागतो आणि त्यामुळे अशा महिला पर्यटकांना भारतदौरा म्हणजे जणू नरकयातनाच असा आभास होतो.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाची विद्यार्थिनी मिशेल क्रॉस. गेल्या वर्षी भारतभेटीवर ती आली. भारतातातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतांना अनेक सुखद, रोमांचक अनुभव तिने अनुभवले. मात्र, काही विकृत नजरा तिला मनस्ताप देणाऱ्या ठरल्या. पुण्यातील गणेशोत्सवात नृत्य करीत असतांना काहींनी तिचे चित्रीकरण केले तर शॉपिंग करत असतांना गर्दीत लोक तिला घृणास्पद स्पर्श करीत होते, तर काही विकृत नजरेने न्याहाळत होते. याचा अतिरेक म्हणजे दोन दिवसात दोनदा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तिने सांगितले.
आपल्या देशाच्या भेटीवर आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत आपली वागणूक कशी आहे यावरून त्यांच्या मनात आपली प्रतिमा बनत असते. भारताचे प्राकृतिक सौंदर्य अद्वितीय असले तरीही इथल्या काही मुठभर लोकांच्या वाईट प्रवृत्तीमुळे तमाम भारतीयांचीच बदनामी होते. असे वागणे अशोभनीय तर आहेच मात्र अतिथी किंवा स्त्रियांविषयी आदरभाव व्यक्त करणाऱ्या भारतीय संस्कृतीलाही मारक आहे. अशाने विदेशी पर्यटकांच्या भारतभेटीवर परिणाम होऊन त्यातून मिळणाऱ्या महसुलासही मुकावे लागेल. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेक घटकांच्या रोजगारावरही याचा अनुचित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा विकृत वागण्याच्या परिणामांचा विचार करून तरी आपली वर्तणूक अशा पर्यटकांकांप्रती शुद्ध ठेवावी.