लग्नमंडपातून वधूचे पलायन…..मन उध्वस्त करणारा प्रसंग….!

काल-परवाचा एका लग्नातील ‘दुर्दैवी’ किस्सा आहे. दुर्दैवी अशासाठी की जे लग्न झालंच नाही, याउलट अनेक मनं उध्वस्त करून गेलं त्याला दुर्दैवी नाही तर अन्य काय म्हणणार?lagna

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन तसं दोन परीवारही ‘सोयरीकी’च्या एका अतूट बंधनात बांधले जातात. मात्र झालं  उलटंच! वाजत-गाजत वरात लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराशी आली. तसे भटजीबुवांनी वधूलाही मंडपात आणण्याची सूचना केली तशी वधूपक्षाची लगबग सुरु झाली. मात्र बरांच वेळ झाला तरीही वधू येईच ना! नंतर सर्व प्रकार समजला. वधू लग्नमंडपातून लग्ना आधीच पळून गेली.

तिचे दुसऱ्याच कुणावर प्रेम होते म्हणे! मग, हे आधीच नाही का लक्षात आलं? वधूच्या पळून जाण्याने तिचा प्रश्न सुटला असेल, मात्र कितीतरी असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहतात त्याचे काय? तिच्या आई-वडिलांनी तिच्या सुखी-संसाराविषयी कितीतरी स्वप्नं बघितलेली असतात? ते तर उध्वस्त होतातंच उलट त्यांचीच समाजात नाचक्की होते. मुलीवर चांगले संस्कार न केल्याचा ठपका त्यांच्याच माथी पडतो ना? कोणताही गुन्हा न करताच जबर शिक्षा त्यांना भोगावी लागते.
मुलीने केलेल्या विश्वासघाताचा जबरदस्त धक्का त्यांना बसतो. त्यातंच एखाद्याचे काही बरे-वाईट नाही झाले म्हणजे मिळविले! वराचीही परिस्थिती याहून वेगळी नसते! आपल्या विवाहाची अनेक स्वप्नं त्यानेही रंगवलेली असतात ती सर्व उध्वस्त होतांना उघड्या डोळ्यांनी बघणे त्याच्या नशिबी येते. वराचे आई-वडीलही चिंताग्रस्त होतात. अशा घटनेमुळे प्रेमाचे पावित्र्य मात्र धोक्यात येते! त्यातंच प्रेमाविषयी वाढत्या गैरसमजांना बळकटी येते.

   टी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या बऱ्याच ‘लोकप्रिय’ मालिकांमध्ये देखील असे प्रसंग दाखविले जातात. अशाने ह्या घटनांना अधिकच प्रोत्साहन मिळते. असे करणार्यांना अशा मालिकांमधून एकप्रकारे मार्गदर्शनच केले जाते. त्यामुळे मन उध्वस्त करणारे असे प्रसंग चित्रपट-मालिकांमधून दाखविणे बंद केले पाहिजे असेच वाटते.