गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यास महत्व द्यावे….

गणेशोत्सव म्हटला की उत्साह, आनंद आणि जल्लोष! गणेश चतुर्थीला वाजत-गाजत, गुलालाची उधळण करीत घरघरांत, चौकाचौकात गणेशाची स्थापना केली जाते. त्यानंतर पुढील दहा दिवस भक्तिभावाने गणेशाची आराधना केली जाते. वेगवेगळ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजनही पाहायला मिळते. दहा दिवस बाप्पांनी मुक्काम केल्या नंतर अनंत चतुर्दशीला पुन्हा वाजत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो!183263_488127851206958_608434585_n

लोकमान्य टिळकांनी स्थापन केल्यापासून गेली सव्वाशे वर्ष सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा पारंपारिक उत्सव असल्यामुळे ह्या उत्सवाचे पारंपारिकत्व जपणे अत्यंत महत्वाचे आहे. उत्सवाचे मांगल्य जपतांना कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक गणेशभक्तांनी घेणे जरुरीचे आहे. मुख्यकरून निष्कारण वाद टाळावेत. गणेशोत्सव हा सर्वांचाच उत्सव असल्याने सगळ्यांनाच ह्या उत्सवात समाविष्ट करून घ्यायला हवे.

गणेशोत्सवाचा जल्लोष कायम ठेवतांना काही गोष्टींवर ध्यान देणेही गरजेचे आहे. पारंपारिक उत्सव साजरा करतांना वाद्यही पारंपरिकच हवीत. ढोल-ताशाच्या अथवा अन्य पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत लाडक्या गणरायाची मिरवणूक काढायला हवी. डी.जे.वर कर्णकर्कश आवाजात ‘आयटम सॉंग’ च्या तालावर विकृत हावभाव करून नाचतांना गणेशोत्सवाचे पावित्र्य हरवते. जी गाणी घरात सगळ्यांसमोर बघतांना अवघडल्यासारखे होते, ती गाणी गणेशोत्सवात डी.जे.वर वाजवून काय संदेश जातो याची कल्पना न केलेलीच बरी! यातून ध्वनिप्रदूषण होते ते वेगळेच! डी.जे.चा आवाज इतका मोठा असतो की, त्यामुळे आजूबाजूचे वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच आजारी लोकांना त्रास होण्याचा संभव असतो. त्यामुळे उत्सव साजरा करीत असतांना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलेली बरी! तरच गणेशोत्सवाचे मांगल्य टिकून राहील!