श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती
|आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! प्रत्येक संकटातील तारणहार म्हणून द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्णाला मान्यता आहे! महाभारतातील कथांमधून त्याचा बोधही होतो. ह्याच महाभारतातील एका प्रसंगात कौरवांनी पांडवांना द्यूतक्रीडेत पराजित केल्यावर पांडवांची पत्नी द्रौपदीला भर दरबारात, सर्वांसमक्ष विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. आपली भक्त आणि एका स्त्रीची होत असलेली विटंबना थांबविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या दरबारात प्रकटले आणि दु:शासन द्रौपदीची साडी ओढत असतांना श्रीकृष्णाने आपल्या शक्तीचा उपयोग करून तिला साडी नेसवीत राहिले. साडी खेचून-खेचून दुःशासन थकला मात्र द्रौपदीची साडी संपेना. शेवटी द्रौपदीची इज्जत वाचली.
आजही हीच परिस्थिती ह्या देशात उद्भवली आहे. भारतात वावरणाऱ्या स्त्रीची अवस्था आज द्रौपदी सारखी झाली असून, अनेक दुःशासन तिची साडी खेचायला तयार आहेत. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांपासून बाजार वा अन्य कामांकरीता बाहेर पडणाऱ्या आणि दिवसा घरात एकट्या राहणाऱ्या महिलाही काही नराधम दुःशासनाच्या शिकार होत आहेत. असहाय्य मनोरुग्ण मुलगी जिला जगातल्या कुठल्याच गोष्टीविषयी काहीच माहिती नाही अशी मुलगीही ह्यांच्या तावडीतून सुटत नाही.
नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे सरकार आणि पोलीस यंत्रणा निव्वळ बघ्याची भूमिका पार पाडतेय की काय? अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. दिल्ली-मुंबईत अशा घटना घडतात तेव्हा तिथले नावाजलेले(?) पोलिसबळ आणि सुरक्षायंत्रणा असूनही असे प्रकार घडतांना पाहून आठवण होते, ती रणांगणात पराक्रम गाजविणारे पांडव, त्यांचे गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि असे अनेक नरवीर उपस्थित असूनही द्रौपदीची इभ्रत संकटात येण्याचे. आज केवळ द्रौपदीची अब्रू वाचविणाऱ्या श्रीकृष्णाचीच नाही, तर तिच्या इभ्रतीवर हल्ला करण्याची हिम्मत दुःशासनाच्या ज्या छातीत आली ती छाती फोडणाऱ्या भीमाचीही आहे! कुकृत्यानंतर गुन्हेगारांना पकडले जाते मात्र, त्यांच्यावर कठोर शासन करण्यास अवास्तव विलंब केला जातो. त्यातच एखादा अल्पवयीन म्हणजेच ‘अज्ञानी’ गुन्हेगार असला तर त्याला शिक्षाही केवळ नावापुरतीच. ज्याला कुकृत्य करण्याइतपत ‘ज्ञान’ असते तो अज्ञानी कसा ठरू शकतो? त्यालाही तेच शासन द्यायला हवे जे प्रौढ गुन्हेगारांना दिले जाते. हि शिक्षा केवळ काही वर्षे कारावास अथवा दंड एवढ्यावरच मर्यादित न ठेवता एखाद्या स्त्रीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्याचे जीवनच संपुष्टात आणणारी मृत्युदंडाचीच शिक्षा सुनवायला हवी आणि तीही घटनेनंतर लवकरात लवकर. तरच आजच्या दु:शासनाला पायबंद बसेल आणि स्त्रीची अवस्था असहाय्य द्रौपदीसारखी होणार नाही!
श्रीकृष्ण ही आबाल-वृद्धांपुढे आदर्श निर्माण करणारी देवता आहे. पुरुषांनी स्त्रीची इज्जत वाचविणाऱ्या श्रीकृषणाचा आदर्श घ्यावा, तिच्या इज्जतीवर घाला घालणाऱ्या दु:शासनाचा नाही!
सर्वाना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!