केवळ फेसबुकवर फोटो नाही टाकला म्हणून घटस्फोटासाठी अर्ज!
|सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्याला आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहण्यासाठी, नवीन मित्र जोडण्यासाठी तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. मात्र ह्याच वेबसाईटमुळे आता पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊन त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याची घटना देखील उघडकीस आली आहे.
दैनिक दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, प्राप्त माहितीनुसार एका पत्नीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर लग्नाआधीचा मैत्रिणींसोबत पिकनिकला गेले असता काढलेला फोटो टाकला. मात्र तिच्या पतीची अपेक्षा होती की तिने आपल्या समवेत लग्नानंतर काढलेला फोटो टाकावा. मात्र पत्नीने तसे केले नाही. याचाच पतीला राग येऊन दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यांच्यातील दुरावा वाढत गेला. सविस्तर बातमी येथे वाचा.
परिणामी दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. ही घटना परदेशातील नसून आपल्या महाराष्ट्रातीलच आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा आपल्या खाजगी जीवनावर परिणाम कसा परिणाम होतो हे त्याचे उदाहरण आहे. असल्या घटना पाश्चिमात्य देशात नवीन नाहीत. मात्र आता आपल्याकडेदेखील असले प्रकार उघडकीस येत आहेत. सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा आपल्या खाजगी जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता नेटीजन्सने विशेष काळजी घ्यायला हवी.