धुलीवंदन
|
होळी हा सण सर्व भारतात मोठया आनंदाने साजरा करतात. फाल्गुन मधील पौर्णिमेला होलिकोत्सव पाच दिवस मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. दुस-या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते तर पाचव्या दिवशी रंगपंचमी.
पूर्वी होळीसाठी मुले लाकडं, गो-या ब-याच दिवस आधीपासून जमा करून ठेवत. जेवढी लाकडं जमतील तेवढा त्यांचा आनंद वाढे. आता वृक्षतोडीमुळे ही सर्व मजा अर्थातच कमी झालेली दिसते. मोठी होळी साजरी करण्यासाठी मोकळी जागा साफ केली जाते. मुले तर आपले घर जणू विसरूनच जातात. मध्यभागी एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. सुंदर हाळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळपर्यंत होळी छानशी रचून तयार होते.
साधारण सात ते आठ वाजता होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीत सबंध नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.
होळीच्या दुस-या दिवशी ‘धुलीवंदन’ येते. रात्रभर होळी जळत असते. सकाळी धुगधुग असतेच पण बाजूच्या लाकडांची राखही खूप असते ही राखच मुले खेळतात. एकमेकांच्या अंगावर उडवतात व भरपूर मस्ती करतात. काही भागात धुलीवंदनाच्या दिवशीच रंगही खेळला जातो. मुलांचा संबंध दिवस धिंगाणा नि मस्ती यातच जातो. एकमेकांचे अवतार पाहण्यासारखे असतात.